सातारा- फलटणमधील निंबाळकर बंधूंच्या निवासस्थानी बुधवारी प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्यात असून, जवळपास 17 तास चौकशी करण्यात आलीय. सलग दुसऱ्या दिवशी चौकशी सुरूच असल्याची माहिती रघुनाथराजे नाईक-निंबाळकरांनी दिलीय. तपास यंत्रणेवर कोणता दबाव असेल, असं वाटत नाही आणि असला तरी त्यात काहीही सापडू शकत नाही. त्यांचा राँग नंबर लागला आहे. प्रत्येक गोष्टीचा आमच्याकडे हिशेब आहे. हा केवळ एक प्रक्रियेचा भाग असून जे झाले ते चांगलेच झाले. किमान साप म्हणून भुई धोपटणे तरी बंद होईल, अशी प्रतिक्रिया रघुनाथराजे नाईक-निंबाळकरांनी गुरुवारी माध्यमांना दिली.
सलग दुसऱ्या दिवशी निंबाळकर बंधूंची चौकशी : फलटणच्या निंबाळकर बंधूंच्या मुंबई, पुणे आणि फलटणमधील निवासस्थानी इन्कम टॅक्स विभागान बुधवारी पहाटे धाडी टाकल्या. काल सकाळी सहा वाजता सुरू झालेली चौकशी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही चौकशी सुरूच आहे. याविषयी बोलताना संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे यांनी ही कारवाई केवळ एक प्रक्रियेचा भाग आहे. तपास यंत्रणेवर कोणाचा दबाव असेल, असं वाटत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
इन्कम टॅक्स विभागाचा 'राँग नंबर' लागला : प्रत्येक गोष्टीचा हिशेब आमच्याकडे आहे. त्यामुळे याच्यातून काहीही निष्पन्न होणार नसल्याचा दावाही रघुनाथराजे नाईक-निबाळकरांनी केलाय. जे झालं ते चांगलंच झालंय. त्यामुळे साप म्हणून भुई थोपटणे तरी बंद होईल. आयकर विभागाचे अधिकारी अतिशय व्यवस्थित रेकॉर्ड तपासत आहेत. हे दोन नंबरचे घर नाही, हे एव्हाना त्यांच्याही लक्षात आले असावे. इन्कम टॅक्स विभागाचा राँग नंबर लागला आहे, असंही निंबाळकर म्हणालेत.
लोकांनी काळजी करू नये : लोक पॅनिक झालीत. मात्र, काळजी करण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रातील काही परिवार स्वच्छ प्रतिमेचे आहेत. आम्ही आयकर व्यवस्थित भरलेला आहे. आयकराचा सोर्सदेखील शुद्ध आहे. त्यामुळे कुठलीच बेकायदेशीर बाब नसल्याचे रघुनाथराजेंनी ठामपणे सांगितलंय. आपला नेता हा दोन नंबरचा माणूस नाही, हे लोकांच्या लक्षात आलंय. कारण हा काही बिहार नाही. इथं सगळ व्यवस्थित आहे. आमच्याकडे प्रत्येक रुपयाचा हिशेब आणि इन्कमचा सोर्स असल्याचंही रघुनाथराजेंनी म्हटलंय.
हेही वाचाः
हवेत उडणारा साप कधी पाहिलाय का? डहाणूमध्ये आढळलेला दुर्मीळ 'सोनसर्प' बघून तुम्हीही व्हाल चकित
भारतीयांना हद्दपार करताना अमेरिकेकडून अमानुष वागणूक, संसदेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी