मुंबई - बोमन इराणी आणि अविनाश तिवारी स्टारर 'द मेहता बॉईज' चित्रपटाचं ग्रँड स्क्रिनिंग काल रात्री म्हणजेच 6 फेब्रुवारी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बोमन इराणी यांनी 'द मेहता बॉईज' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलंय. या चित्रपटात ते देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 'द मेहता बॉईज' चित्रपटात अविनाश तिवारी प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाची कहाणी वडील आणि मुलाच्या नात्याभोवती फिरणारी आहे. हा कौटुंबिक चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. 'द मेहता बॉईज' चित्रपट 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
'द मेहता बॉईज' चित्रपटाचं स्क्रीनिंग : 'द मेहता बॉईज' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगमधील काही फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी बोमन इराणी आणि अविनाश तिवारी व्यतिरिक्त चंकी पांडे, सौंदर्या शर्मा, नसीरुद्दीन शाह आणि त्याची पत्नी रत्ना पाठक, तमन्ना भाटिया, दिया मिर्झा, सिकंदर खेर, मोना सिंग, हिरामंडी अभिनेता ताहा शाह बदुशा, रोनित रॉय, ईशान खट्टर, विकी कौशल, पावेल गुलाटी, जूही चावला जॉनी लिव्ह, अनुपम खेर, बिग बॉस 18चा स्पर्धक अविनाश मिश्रा आणि डेझी शाह हे स्टार्स आले होते. या कार्यक्रमात अभिनेत्री दिया मिर्झा साध्या अंदाजात दिसली. तिनं गुलाबी रंगाची साडी नेसली होती. यात ती खूप सुंदर दिसत होती. तसेच तमन्ना भाटियानं डेनिम आउटफिट परिधान केला होता. यात ती स्टायलिश दिसत होती.
'द मेहता बॉईज' चित्रपटाबद्दल : 'द मेहता बॉईज' या चित्रपटाची निर्माते विकेश भुतानी, दानेश इराणी, बोमन इराणी, शुजात सौदागर, विपिन अग्निहोत्री हे आहेत. या चित्रपटाची पटकथा अलेक्झांडर दिनेलरिस आणि बोमन इराणी यांनी लिहिली आहे. दरम्यान बोमन इराणी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते 'एपीजे अब्दुल कलाम' यांच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिक चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिल सनकारा हे करत आहेत. आता अनेकजण या चित्रपटाच्या अपडेटबद्दल आतुरतेनं वाट पाहात आहेत.