मुंबई Lok Sabha election 2024 : राजकारणामध्ये कोणत्या पक्षाला किंवा नेत्याला कोणत्या गोष्टीचा कधी फायदा होईल आणि त्यामुळं त्या पक्षाचा विजय सोपा होईल हे सांगता येत नाही. राजकारणात निवडणूक आणि खेळात अनिश्चितता असते असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणं निवडणुकांमध्येही अनेकदा त्याचा प्रत्यय येत असतो. एखाद्या उमेदवाराचे पारडे आधी जड वाटत असताना, त्याच्या विरोधातील उमेदवाराला एखाद्या वाक्यानं अथवा घटनेनं अचानक सहानुभूती मिळते आणि अंतिम क्षणी त्याचं पारडे जड होऊन जातं. राजकारणात या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. राज्यातले बडे नेते असलेले शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबतीत या गोष्टीचा प्रत्यय येताना दिसतोय.
पावसातल्या भाषणाचा परिणाम :2019 च्या निवडणुकांमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील हे उमेदवार दिले होते. या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले निवडून येतील असं वातावरण असताना, शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यावेळी अचानक पाऊस सुरू झाला आणि भर पावसात भिजत शरद पवारांनी सभा सुरूच ठेवली. 80 वर्षाच्या एका नेत्याने पावसात भिजत आपल्या उमेदवारासाठी सभा घेतली, याचा मतदारांमध्ये मोठा प्रभाव पडला. त्यामुळं श्रीनिवास पाटील हे त्या मतदारसंघात विजयी झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळं यावेळची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणार आहे.
मडकं फोडणं आणि शरद पवारांचं आजारपण: बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान एका अतिउत्साही कार्यकर्त्यानं प्रचार सभेत मडकं फोडलं. वास्तविक एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अग्नी देण्यापूर्वी मडकं फोडलं जातं. त्यामुळं या कार्यकर्त्यांनी केलेला आतताईपणा हा एखाद्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहणारा आहे, असा संदेश सर्वदूर पसरला. त्यामुळं जनमानसात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. तर त्याचवेळी योगायोगाने शरद पवार हे आजारी पडले आहेत. शरद पवार यांना एक असाध्य आजार गेल्या अनेक वर्षांपासून आहे, हे महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहीत आहे, असं असताना शरद पवारांचं हे आजारपण आणि त्यांच्या संदर्भात केली गेलेली वक्तव्यं यामुळं पुन्हा एकदा शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट निर्माण होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या कृत्यामुळं किंवा एखाद्या व्यक्तीच्या आजारपणामुळं निर्माण होणारी सहानुभूतीची लाट ही त्यांच्या पक्षाला किंवा एखाद्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळं पुन्हा एकदा शरद पवारांच्या आजारपणामुळं त्यांच्या पक्षाला फायदा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केलीय.