मुंबई : मुंबई-पुणे महामार्गाबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्ही मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करत असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई-पुणे महामार्ग अर्थात यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट मंगळवारपासून (11 फेब्रुवारी) एक दोन महिने नाहीतर चक्क सहा महिने बंद राहणार आहे. पनवेल एक्झिट बंद राहणार असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून, या निर्णयाचा त्यांना फटका बसणार आहे.
बंदचा निर्णय का? - रस्त्यावरील वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता, मुंबई-पुणे महामार्गावर विस्तारीकरणाचा प्रकल्प सुरू आहे. यात अतिरिक्त लेन तसंच बायपास रस्त्यांचं बांधकाम सुरू आहे. दरम्यान, कळंबोली जंक्शन येथील नवीन उड्डाण पूल तसंच अंडरपास करण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तयार करणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल एक्झिट मंगळवारपासून (11 फेब्रुवारी) तब्बल सहा महिने बंद राहणार आहे. मुंबई-पुणे महामार्ग हा देशातील पहिला सहा लेन महामार्ग आहे.
पर्यायी मार्ग कोणते? - उद्यापासून पनवेल एक्झिट बंद राहणार असल्यामुळं याचा वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, पनवेल एक्झिट बंद राहणार आहे पण याला पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक अन्य मार्गाकडे वळविली जाणार आहे.
पर्यायी मार्ग
- मुंबई-पुणे महामार्गावरून गोवा-पनवेल आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक कोनफाटा पळस्पे सर्कल मार्गाकडे वळविली जाणार आहे
- पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहने तसंच कल्याण, शिळफाटा आणि तळोजाकडे जाणारी वाहने रोडपाली तसंच NH-48 मार्गाकडे वळविली जाणार आहेत
- वाहनचालकांना गाईड करण्यासाठी साइनबोर्ड आणि वाहतूक कर्मचारी तैनात केले जाणार आहेत
- बांधकाम कुठेपर्यंत आले आहे आणि कामाच्या प्रगतीबद्दल प्रवाशांना नियमित अपडेट्स माहिती दिली जाणार आहे