नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींची खिल्ली उडविली. ते पश्चिम बंगालमधील बर्धमान शहरातील भव्य सभेत बोलत होते. "घाबरू नका. पळ काढू नका," असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " काँग्रेसच्या राजकुमाराला खूप भीती वाटली. त्यामुळे त्यानं अमेठीतून पळ काढला. आता राजकुमार हा रायबरेलीत नव्या संधी शोधत आहे. काँग्रेसच्या सर्वात वरिष्ठ नेत्याला लोकसभेत पराभवाची भीती होती. त्यामुळे त्यांनी ( सोनिया गांधी) राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून येण्याचा पर्याय निवडला. राजपुत्राचा वायनाडमध्ये पराभव होत असल्याचं आधीच म्हटलं आहे. आणखी तिसऱ्या मतदारसंघाचा राजपुत्र शोध घेतील. अमेठी हा सुरक्षित मतदारसंघ नसतानाही त्याच्या सहकारी आणि निष्ठावंतांना तेथून राजपुत्र निवडणूक लढवेल, अशी आशा होती. मात्र, तो भीतीन पळून रायबरेलीकडं वळाला. हे लोक इतरांना घाबरू नका, असं सांगतात. त्यांना आज मी मनापासून सांगतो, घाबरू नका. पळू नका." यावेळी मोदी यांनी विविध मुद्द्यांवरून इंडिया आघाडीसह काँग्रेसवर जोरदार टीका केली. हे लोक जिंकण्यासाठी नव्हे तर देशाची तुकडे करण्यासाठी निवडणूक लढवित असल्याचा पंतप्रधान मोदींनी आरोप केला.
लाँचिग यशस्वी झाले नाही-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकमधील हुक्केरी येथील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, "सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना अनेकवेळा लाँच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यांचा हा एकविसावा प्रयत्न होता. पंतप्रधान मोदी यांनी चांद्रयान मोहिमेचा एकवेळा प्रयत्न केला. ते यशस्वी झाले. सोनिया गांधींनी त्यांचे राहुल बाबा नावाचे यान लाँच करण्याचा 21 वेळा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे लाँचिग यशस्वी झाले नाही. आता, ते अमेठीमधून पळ काढत रायबरेलीमधून एकविसाव्या वेळी प्रयत्न करत आहेत. राहुल बाबा, मी तुम्हाला रायबरेलीचा निकाल सांगत आहे. भाजपा उमेदवार दिनेश प्रतास सिंह यांच्याकडून तुमचा मोठ्या फरकानं पराभव होईल. माझे शब्द लिहून ठेवा."