शिर्डी- गेल्या काही दिवसांपूर्वी शिर्डी साईबाबा संस्थानमधील सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. नितीन शेजुळ अन् सुभाष घोडे हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपवून घरी निघाले होते. तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला. मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली होती. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तिन्ही निरपराध नागरिकांवर चाकूनं असंख्य वार केलेत. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी शिर्डी ग्रामसभा : या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि शिर्डीत वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी सोमवारी शिर्डीत निषेध ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेला ग्रामस्थांसह मृतांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेला सुरुवात करण्याआधी शिर्डी ग्रामस्थांनी शहरातून मशाल मोर्चा काढलाय. यावेळी मृत घोडे आणि शेजूळ यांच्या मुलींनी मशाल हातात घेऊन आरोपींचा एन्काऊंटर करा, अशा मागणीच्या घोषणा देत हा मशाल मोर्चा साईबाबांच्या द्वारकामाईसमोरील खुल्या नाट्यगृह मैदानावर पोहोचला.
...अन् शेजूळ यांची चिमुकली मुलगी गौरी ढसाढसा रडली : दरम्यान, यावेळी येथे लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्डावरील वडिलांच्या फोटोवर नजर पडताच मृत नितीन शेजूळ यांची चिमुकली मुलगी गौरी ढसाढसा रडू लागली, ते पाहून पाहून शिर्डी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोतेंनाही अश्रू अनावर झालेत. "रडू नको बाळा" आम्ही तुझ्यासोबत आहेत, असे म्हणत कोते यांनी गौरीला जवळ घेत तिची समजूत काढली. यावेळी उपस्थित अनेक ग्रामस्थांचे डोळेही पाणावले. निषेध ग्रामसभेच्या सुरुवातीलाच गौरीच्या अश्रूंनी आणि आक्रोशाने वातावरण हळवे झाले.
हेही वाचा -