महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

डोलीतून रायगडावर पोहोचले शरद पवार; स्वतः 'तुतारी' वाजवत नव्या चिन्हाचं अनावरण - Sharad Pawar at raigad

NCP Sharad Pawar : निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे नवं चिन्ह दिलंय. यानंतर आज (24 फेब्रुवारी) शरद पवार गटाकडून रायगड किल्ल्यावर या चिन्हाचं अनावरण करण्यात आलंय. यावेळी शरद पवार हे 40 वर्षांनी रायगड किल्ल्यावर आले होते.

NCP Sharad Pawar
NCP Sharad Pawar

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 1:30 PM IST

Updated : Feb 24, 2024, 1:52 PM IST

रायगड NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला नवं नाव आणि चिन्ह दिलंय. 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह बहाल केलंय. शरद पवार गटानं या नवीन चिन्हाचं अनावरण रायगड किल्ल्यावर केलंय. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार 40 वर्षांनी रायगड किल्ल्यावर : पक्षाच्या चिन्ह अनावरणासाठी शरद पवार हे तब्बल 40 वर्षांनी रायगड किल्ल्यावर दाखल झाले होते. आधी रोप-वे आणि नंतर डोलीतून शरद पवारांना किल्ल्यावर नेण्यात आलं. त्याठिकाणी पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह पक्षाच्या नव्या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं.

रणशिंग फुंकायला तुतारी दिली : यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, "सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले. परंतु, रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचं राज्य सामान्यांची सेवा करणारं राज्य होतं. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचं राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. निवडणूक आयोगानं रणशिंग फुंकायला तुतारी दिलीय. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिहासिक भूमीत आपण आलो. याठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया."

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात :केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे बहाल केलं होतं. या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश येईपर्यंत 'तुतारी वाजवणारा माणूस' हेच शरद पवार गटाच्या पक्षाचं चिन्ह असणार आहे. 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हावरच शरद पवार गटाला यापुढील निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.

हेही वाचा :

  1. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट नवीन चिन्हावर रणशिंग फुंकणार; महाराष्ट्रात तुतारी वाजणार का? काय आहेत शक्यता?
  2. शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं दिलं नवं चिन्ह; चिन्ह मिळताच शरद पवार गटाची खास पोस्ट
Last Updated : Feb 24, 2024, 1:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details