मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. या एकूण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अल्पकालीन चर्चेदरम्यान सविस्तर उत्तर देऊनही विरोधकांचं समाधान झालेलं नाही. तर दुसरीकडं या हत्याकांडात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या मुद्द्यावरुन भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडेंवर टीका केलीय. त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आता 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याचं बघायला मिळतंय.
आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई : संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. नागपूरमध्ये सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी पहिल्या दिवसापासून हा मुद्दा लावून धरला. यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विधानसभेत सविस्तर निवेदन दिलं. यासोबत या हत्याकांडात समाविष्ट सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची घोषणाही त्यांनी केली. विशेष म्हणजे या प्रकरणातील प्रमुख आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा दावा अनेकांकडून केला जातोय. या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव आलं असून ते मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू असल्यानं मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
सुरेश धस नेमकं काय म्हणाले? : संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन दिल्यानंतर देखील भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, "मी धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं तुमचे जे शागीर्द (वाल्मिक कराड) आहेत त्यांनी हे उद्योग केलेत. त्यामुळं त्यांना लवकरात लवकर सरेंडर करायला सांगा. परंतु, त्यांनी असे शागीर्द सांभाळलेत की त्यांच्या आदेशावर सुद्धा ते आतमध्ये येत नाहीत. त्यांचे शागीर्द सुद्धा त्यांचं ऐकत नाहीत. अशा परिस्थितीत 1 लाख 42 हजार मतांनी तुम्ही कसे निवडून आले", असा प्रश्नही सुरेश धस यांनी केला.
धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी 100 टक्के सरकारचे प्रयत्न : दुसरीकडं या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधी पक्ष संतुष्ट नाही, म्हणून आम्ही सभात्याग केला. धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी 100 टक्के सरकार प्रयत्न करत आहे. हे प्रकरण सरकारनं आता संपवून टाकलंय. या संदर्भातील लढाई आता रस्त्यावर लढवली जाईल." तसंच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी (21 डिसेंबर) बीडला जात असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं.
हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही : या सर्व प्रकरणावर आता खुद्द धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. "या प्रकरणात दूध का दूध, पाणी का पाणी लवकरच होईल," असं ते म्हणाले आहेत. "मुख्यमंत्र्यांनी याबाबत सविस्तर उत्तर दिले आहे. ज्या निर्घृण पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही. या प्रकरणामध्ये एसआयटी नेमली असून सीआयडी सुद्धा तपास करणार आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात मकोका लावण्याचा निर्णय घेतलाय. तशा पद्धतीचा मकोका बीड जिल्ह्यात इतरही प्रकरणात लावण्याची गरज आहे", असंही धनंजय मुंडे म्हणाले. तसंच "विरोधकांनी काय बोलायला हवं हे मला सांगता येत नाही. परंतु, कराड अण्णा कुठे आहेत हे पोलिसांना समजलं असतं तर त्यांनी त्यांनाही अटक केली असती," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -