नाशिक : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह शुक्रवारी (दि. २४) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अमित शाह यांच्या उपस्थितीत मालेगाव तालुक्यातील अजंग येथे सहकार परिषद पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? : यावेळी अमित शाह यांनी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा पाढा वाचत अमित शाह यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. "दहा वर्ष शरद पवार हे देशाचे कृषिमंत्री होते. त्या काळात त्यांनी शेतकऱयांसाठी काय केलं याचा हिशोब द्यावा, मार्केटिंग करुन राजकारण होत नसतं," असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
शरद पवारांना थेट सवाल : "शरद पवार तुम्ही दहा वर्ष कृषिमंत्री होतात. त्यावेळी सहकार खातं तुमच्याकडे होतं. आता महाराष्ट्रातील जनतेला हिशोब द्या, राज्यातील सहकार आंदोलनासाठी तुम्ही काय केलं? साखर कारखानदारीसाठी तुम्ही काय केलं? टॅक्ससाठी तुम्ही काय केलं? शेतकऱ्यांसाठी काय केलं? सहकार क्षेत्रासाठी काय केलं? मार्केटिंग करुन नेता होणं योग्य नाही," अशा शब्दात अमित शाह यांनी शरद पवारांचा समाचार घेतला.
त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतलं दर्शन : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल होत सपत्नीक पूजा केली. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं शाह यांचं स्वागत करण्यात आलं. शाह यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे उपस्थित होते.
हेही वाचा -