पुणे : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तर महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेवरील सत्ता पुन्हा एकदा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कंबर कसलीय. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उबाठा) महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची चर्चा होती. त्यावरच आता शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? : संजय राऊत यांनी आज (21 डिसेंबर) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, "महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं (उबाठा) स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळं आम्ही मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर तर इतर महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत", असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. तसंच "मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना (उबाठा) हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळं काहीही करुन आम्हाला मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची आहे. नाहीतर मुंबई वेगळी होईल. ज्या पद्धतीनं मराठी माणसांवर हल्ले सुरू आहेत. ते पाहिलं तर आम्हाला मुंबई महापालिकेत सत्ता मिळवणं गरजेचं आहे", असंही राऊत म्हणाले.
...तर आम्ही जुन्नरची जागा जिंकलो असतो : पुढं ते म्हणाले, "आम्ही अजूनही महाविकास आघाडी सोबतच आहोत. आम्ही महायुतीत असताना देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावरच लढल्या आहे. महापालिका निवडणूक तसंच जिल्हा परिषदेच्या निवडणूक या स्वबळावर लढाव्या अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. विधानसभेत देखील काही जागा आम्हाला वाटत होत्या की त्या लढाव्या. पुणे जिल्ह्यातील खेडमधील जागा देखील आम्ही शेवटच्या टप्प्यात आमच्याकडं घेतली आणि ती जिंकली. जुन्नरची जागा देखील आम्ही लढलो असतो तर जिंकलो असतो. पण निवडणुकीत जेव्हा आघाडी असते तेव्हा अशा गोष्टी घडत असतात."
सत्ताधाऱ्यांवर टीका : सत्ताधाऱ्यांवर टीका करत राऊत म्हणाले की, "राज्यात जे काही चित्र सध्या दिसतंय, ते खूपच चिंताजनक आहे. राज्यात काय चाललंय हे कोणालाच माहीत नाही. सरकार स्थापन झालं तर मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही आणि मंत्रिमंडळ स्थापन झालं तर खातेवाटप अजूनही झालेले नाही. बहुमत असूनही त्यांना खातेवाटप करता येत नाहीय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय."
हेही वाचा -