मुंबई : परभणीत 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परभणीत मोठा हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेत पोलिसांनी काहींना अटक केली होती. त्यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. तसंच आंदोलनादरम्यान विजय वाकोडे यांचाही मृत्यू झाला होता. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या सोमवारी (23 डिसेंबर) परभणी दौऱ्यावर येणार आहेत. ते सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. दरम्यान, राहुल गांधींच्या या दौऱ्यावर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे.
नौटंकी करण्यापेक्षा समाजाला न्याय देण्याचं काम करा : राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर भाजपा नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. "राहुल गांधी यांचा उद्याचा परभणी दौरा हा नौटंकी आहे. त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीची नौटंकी करण्यापेक्षा समाजाला न्याय देण्यासाठी काम केलं पाहिजे," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
असा असेल राहुल गांधींचा दौरा : दुपारी 12.30 वाजता राहुल गांधी यांचं विशेष विमानानं नांदेड येथे आगमन होईल, नांदेडहून ते परभणीला जातील. दुपारी 2.15 ते 3.15 वाजता ते सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतील आणि त्यानंतर विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. या दोन कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी नांदेडकडे प्रयाण करतील. संध्याकाळी 5.15 वाजता विमानानं दिल्लीला जातील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबाबत माहिती दिली. कोठडीत असताना त्याचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत. त्यात त्याला मारहाण झाली नसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्याच्या हाडांना दुखापत झाल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाणार आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप : गेल्या काही दिवसांपासून बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. माजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळं राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा