कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात '50 खोके एकदम ओके' वाक्यानं जनसामान्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता कोल्हापुरात 25 खोक्यांच्या किमतीचा 'आमदार' पाहण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात तुडुंब गर्दी झाली आहे. त्याचं नाव 'आमदार', वय अवघं 4 वर्ष, वजन तब्बल दीड टन, देशात कुठंही फिरण्यासाठी एसी वाहनाची खास सोय. मुऱ्हा जातीच्या या रेड्याला महिन्याकाठी एक लाखांचा नुसता खुराकचं लागतो. भरभक्कम शरीरयष्टी, देखणं रूप आणि 25 कोटी किंमत यामुळं हे जनावर नेमकं आहे तरी कसं? हे पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची अक्षरशः रीघ लागली आहे.
जगातील सर्वात उंच रेडा : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यामार्फत गेली 17 वर्ष कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर भीमा कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन विकसित झालेली बी-बियाणं तसंच पाळीव पशुपक्षी हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असतात. यंदा या कृषी प्रदर्शनात हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील नरेंद्र सिंह यांचा 'आमदार' रेडा प्रमुख आकर्षण ठरत आहे. "या रेड्याचं वजन 1500 किलो असून त्याची लांबी 14 फूट आहे. तर, साडेपाच फूट उंची असल्यामुळं 'आमदार'चे पालनकर्ते नरेंद्र सिंह यांनी हा जगातील सर्वात उंच रेडा असल्याचा दावा केला आहे. या रेड्याच्या देखरेखीसाठी दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, आठवड्याला माणसांप्रमाणं आमदार या रेड्याची हजामत केली जाते. देशभरात होणाऱ्या विविध कृषी प्रदर्शनात आमदार रेड्याचं खास आकर्षण असतं. आत्तापर्यंत या आमदारानं तब्बल सातवेळा राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. कमी वयात सर्वात उंच असल्यामुळं जगातील सर्वात उंच रेडा असल्याचा दावा पद्मश्री नरेंद्र सिंह यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला.
असा आहे दिवसभराचा खुराक : आमदार रेड्याच्या शारीरिक मसाजसाठी एक जण तर, चारा आणि देखभालीसाठी एक जण असं दररोज दोघजण रेड्याची देखरेख करतात. दिवसाला 20 लिटर दूध, 20 किलो फिड, 30 किलोचा चारा आणि भुसा असा आमदार रेड्याचा दिवसभराचा खुराक आहे. दिवसभरातून तीनवेळा त्याला आंघोळ घातली जाते, यासह वातानुकूलित कक्षातच रेड्याची दररोज देखरेख राखली जाते.
नरेंद्र सिंह यांच्याकडे चौथ्या पिढीतील 'आमदार रेडा' : 2017 साली 'पद्मश्री' पुरस्कार प्राप्त नरेंद्र सिंह यांच्याकडं मुऱ्हा जातीची जनावरं आहेत. युवराज, सुलतान, गोलु-2 आणि आता आमदार अशी चौथी पिढी सिंह मोठ्या जबाबदारीनं सांभाळत असून रेड्याच्या वीर्यापासून नवीन ब्रीड तयार करण्यातही सिंह यांना यश मिळालं आहे. भीमा कृषी प्रदर्शनात या रेड्याला पाहण्यासाठी आबालवृद्धांनी एकच गर्दी केल्याचं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
- ठाण्यातील वडापाव पोहोचला सातासमुद्रापार; अमेरिका, जपान, दुबईच्या नागरिकांना मराठमोळ्या वडापावची भुरळ!
- व्वा रे पठ्ठ्या; शेतकऱ्यानं पोलिसांच्या नाकावर टिच्चून फुलवली अफूची शेती: 12 कोटींची अफूची झाडं जप्त
- वेणूताईंची जन्मशताब्दी : साताऱ्यात महिलांसाठी वर्षभर भरगच्च कार्यक्रम, शरद पवारांच्या हस्ते होणार समारोप