छत्रपती संभाजीनगर : शिक्षण विभाग कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. पोलीस सुरक्षा, सीसीटीव्ही लावणे अशा अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खुलेआम कॉपी पुरवल्या जात आहेत. त्यामुळंच पैठण तालुक्यात अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्यांना अडवण्यासाठी शाळेच्या भोवती चक्क चरीसारखा छोटा खंदक खोदण्यात आला आहे. खोदलेल्या खड्ड्यांमुळं परीक्षा केंद्राकडं येण्यास अडचण निर्माण होईल, परिणामी अधिक सुरक्षा होईल असा मानस असल्याचं मुख्याध्यापक शंकर वाघमोडे यांनी सांगितलं.
शाळेभोवती खोदली चर : शुक्ररपासून दहावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. शिक्षण बोर्डानं कॉपी मुक्त परीक्षा राबवण्यासाठी पुढाकार घेतलाय. दरवर्षी अनेक योजना करूनही अनेक परीक्षा केंद्रांवर विशेषतः ग्रामीण भागांमध्ये कॉपीचं प्रमाण वाढत आहे. याच अनुषंगानं कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी म्हणून शिक्षण विभागानं पैठण तालुक्यातील जायकवाडी येथील दहावीच्या शाहू विद्यालय परीक्षा केंद्रावर अफलातून उपाययोजना केलीय. या केंद्रावरील शाळेच्या चारही बाजूनं तीन फूट खोल आणि तीन फूट रुंद चर खोदली आहे. खड्डे खोदल्यानं परीक्षार्थींना कॉपी देण्यास केंद्रबाहेरील व्यक्तींना अडचण निर्माण झाली आहे. चारही बाजूनं ही उपाय योजना केल्यानं शाळेतील खिडकीपर्यंत पोहचता येणार नसल्यानं निश्चित कॉपी देणाऱ्याला तिथं येणं शक्य होणार नाही. त्यामुळं खूप फरक पडेल असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक शंकर वाघमोडे यांनी व्यक्त केला.
कॉपी थांबण्यासाठी अनेक उपाय योजना : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी परीक्षा मंडळानं अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. भरारी पथक सर्वत्र तैनात आहेत. परीक्षार्थी केंद्रावर जात असताना त्यांची तपासणी करणं, पोलिसांचं पथक निर्माण करणं, प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे अद्यावत करणं अशा उपाय योजना केल्या जातात. तर कधी केंद्रावर असलेले शिक्षक कर्मचारी यांची दुसऱ्या केंद्रावर नियुक्ती देखील केली जाते. तरी देखील कॉपी थांबण्यात यंत्रणा कमी पडत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं पहिल्यांदाच केलेली ही उपाययोजना उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.
हेही वाचा -
- कोट्यवधी खर्च करून तयार केलेल्या समृद्धी महामार्गावर भेगाच नाही तर खड्डे देखील; टोल देऊनही जीव मुठीत घेऊन प्रवास - Samruddhi Mahamarg Potholes
- मुंबई नाशिक महामार्ग ; पुढील 10 दिवसात वाहतूक सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना निलंबित करणार : छगन भुजबळ - Chhagan Bhujbal Warns Officer
- रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात मनसेनं भरवली भ्रष्टाचाराची शाळा; पाहा व्हिडिओ - MNS Protest