कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातील षटकार लगावलेले नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी प्रचाराl केलेल्या आपल्या विधानावरून 'यू टर्न', घेतला आहे. कागलमधून सहाव्यांदा निवडून द्या आपल्याला उपमुख्यमंत्री पदाची संधी आहे, असं मंत्री मुश्रीफ म्हणाले होते. मात्र, आज मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात आलेल्या मुश्रीफांनी आपलं विधान लोकांना उत्साहित करण्यासाठी होतं असं स्पष्टीकरण पत्रकारांशी बोलताना दिलं.
करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री प्रकाश आबिटकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेले हसन मुश्रीफ आज पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते. महायुतीकडून दोन्ही मंत्र्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. दोघांनीही करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
कोल्हापूरला दोन मंत्रिपदे मिळाली : यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, "राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये मला कॅबिनेट मंत्री होण्याची संधी मिळाली, करवीर निवासिनी आई अंबाबाई, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली. जे काम आम्ही हातात घेणार आहे ते महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी असून त्या कामात यश प्राप्ती होऊ दे असं साकडं अंबाबाईला घातलं. तर कोल्हापूर जिल्ह्याला माझ्या आणि आबिटकरांच्या रुपाने दोन मंत्रिपदं मिळाली आहेत. या माध्यमातून कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न सोडवणार असल्याचा संकल्पही केल्याचं त्यांनी सांगितलं".
खाते वाटप लवकरच, भुजबळांची नाराजी दूर होणार : महायुतीच्या मंत्रिमंडळात अजूनही खातेवाटप झालं नाही याबाबत मुश्रीफ म्हणाले की, लवकरात लवकर नेतेमंडळी एकत्र बसतील आणि राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच होईल. तसंच छगन भुजबळांची लवकरच मनधरणी करून त्यांची समजूत काढणार असल्याचं स्पष्टीकरण भुजबळांच्या नाराजी नाट्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं.
पंतप्रधान मोदी, अमित शाह यांना भेटणार : कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात असंतोष उडाला असून या प्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करू. यातून मार्ग न निघाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचंही मंत्री मुश्रीफ म्हणाले.
हेही वाचा -