अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी (22 डिसेंबर) धर्माच्या नावाखाली होणारे सर्व छळ आणि अत्याचार हे गैरसमज आणि धर्माच्या आकलनाच्या अभावामुळं घडत असल्याचं म्हटलं आहे. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? : अमरावती येथील महानुभाव आश्रमाच्या शताब्दी समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की, धर्म हा महत्त्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीनं शिकवला गेला पाहिजे. कारण धर्माचं अयोग्य आणि अपूर्ण ज्ञान अधर्माकडे घेऊन जातं. धर्माच्या नावाखाली जगभर जे छळ आणि अत्याचार झाले, ते खरं तर गैरसमज आणि धर्माच्या आकलनाच्या अभावामुळंच घडलेत.
धर्माचं आचरण म्हणजे धर्माचं रक्षण : "धर्म नेहमीच अस्तित्त्वात आहे आणि सर्व काही त्याच्यानुसार चालतं. त्यामुळंच त्याला "सनातन" असं म्हटलं जातं, असं प्रतिपादन मोहन भागवत यांनी केलं. धर्माचं आचरण म्हणजे धर्माचं रक्षण, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.
मोहन भागवत यांनी गुरुवारी (19 डिसेंबर) एका कार्यक्रमात बोलताना राम मंदिर आणि हिंदू धर्मासंदर्भात मोठं वक्तव्य केलं होतं. यावेळी बोलत असताना मोहन भागवत म्हणाले, "धर्म हा प्राचीन असून धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झालीय, ती योग्यच आहे. परंतु, मंदिराची निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही. तसंच भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामातून तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशयापोटी रोज एक नवीन प्रकरण काढून चालणार नाही," असंही ते म्हणाले. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी भाजपाला उद्देशून हे विधान केल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा