मुंबई : मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. या शहरानं अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू देशाला दिले आहेत. अशातच आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचा आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना होणार असताना मुंबईत क्रिकेट प्रेमींमध्ये आज सकाळपासूनच उत्सुकता पाहायला मिळत आहे. अनेक जणांनी आपल्या मित्र आप्तेष्टांसोबत आजचा सामना पाहण्याचं प्लॅनिंग केलंय. मात्र, अशातच मध्य आणि पश्चिम रेल्वेनं मेगा ब्लॉक घेतल्यानं मुंबईकरांच्या आनंदात आज 'मेगाब्लॉक'चा अडथळा येण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं आज उपनगरीय वाहतुकीत देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर केलाय. या मेगाब्लॉकचा अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.
रेल्वेच्या वेळापत्रकात काय बदल? : मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 09:34 ते दुपारी 03:03 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन फास्ट आणि सेमी फास्ट लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आलीय. महत्त्वाची बाब म्हणजे ब्लॉक काळात जलद गाड्यांना कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्यात आलं असल्यानं या लोकल गंतव्यस्थानी सुमारे 10 मिनिटे उशिरानं पोहोचतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीय.
मेल एक्सप्रेस गाड्यावरही होणार परिणाम- कल्याण ते ठाणे स्थानका दरम्यान सकाळी 10:28 ते दुपारी 3:40 दरम्यान सुटणाऱ्या अप फास्ट आणि सेमी-फास्ट लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. याचा परिणाम मेल एक्सप्रेस गाड्यांवरदेखील होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरला पोहोचणाऱ्या अप मेल एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान लाईन 6 व्या मार्गिकेवर वळवल्या जातील.
ट्रान्स हार्बर रेल्वे : दुसरीकडं मध्य रेल्वेने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर देखील ब्लॉक जाहीर केला असून, सकाळी 10:25 ते दुपारी 4:09 या वेळेत पनवेल/नेरुळ/वाशी येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप ट्रान्स हार्बर लाईन सेवा बंद राहणार आहेत. तर, ठाण्याहून वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील डाऊन सेवा सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
पश्चिम रेल्वे : पश्चिम रेल्वेनं देखील मेगा ब्लॉकची घोषणा केली असून सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक दरम्यान सर्व जलद लोकल गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या जाणार आहेत. वाणगाव-डहाणू रोड स्थानकांदरम्यान सकाळी 09.50 ते 10.50 या वेळेत एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली आहे.
हेही वाचा -