नंदुरबार : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेत. त्यातच नंदुरबार जिल्ह्यात कोण बाजी मारणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय. नंदुरबार जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. एकेकाळी हे चारही मतदारसंघ काँग्रेसचा गड मानले जायचे. या जिल्ह्यातून काँग्रेसचे टॉप टेन खासदार म्हणून दिवंगत माणिकराव गावित यांनी इतिहास रचलाय. तर आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचा देखील जिल्ह्यावर दबदबा राहिलाय. त्याच फळीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वकील के. सी. पाडवी यांनी सात वेळा आमदारकी भूषवली असून आठव्यांदा ते आपलं भवितव्य आजमावत आहेत.
विजयकुमार गावित सातव्यांदा गड राखणार?: सन 1995 पासून विधानसभेत निवडून येणारे डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघात आपलं वलय निर्माण केलय. गेल्या पाच टर्मपासून विधान परिषदेवर रघुवंशी परिवाराची एक हाती पकड होती. एकंदरीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विधानसभा मतदारसंघात भाजपानं मुसंडी मारत बरोबरी गाठली आहे. तर एकेकाळी काँग्रेसची ढाल म्हणून असलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी सद्यस्थितीत त्याच काँग्रेसवर धनुष्यबाण चालवीत असल्याचं चित्र दिसून येतंय. त्यामुळं या लढ्यात विधानसभेत काँग्रेस आपला गड कायम ठेवण्यात यशस्वी होतो की महायुती मुसंडी मारते याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलंय.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून गेल्या आठ टर्मपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. के. सी. पाडवी यांनी आपला विजयरथ कायम ठेवलाय. मागी विधानसभा निवडणुकीत त्यांना निसटता विजय मिळाला. त्यांच्यासमोर विद्यमान विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी तत्कालीन उबाठाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या मदतीनं काँग्रेसच्या उमेदवाराला पराजित करण्यासाठी कंबर कसली होती. यात त्यांना बऱ्यापैकी यश देखील आलं होतं. मात्र, मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत काँग्रेसचे विद्यमान आमदार के. सी. पाडवी विजयी झाले.
यंदा आमश्या पाडवी (शिंदे गट) यांनी आपले चिरंजीव विद्यमान जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी यांच्यासाठी शिंदे गटातून उमेदवारी मागितली होती. तर याच मतदारसंघातून शिंदे गटातूनच विद्यमान शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील विजय पराडके आणि किरसिंग वसावे यांच्यासाठी मागितल्याचं सांगितलं जातंय. तर काँग्रेसमधून विद्यमान आमदार एकमेव उमेदवार असल्यामुळं त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर माजी खासदार डॉ. हिना गावित यादेखील याच मतदारसंघातून उमेदवार असणार असल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगू लागल्यात. मात्र, भाजपा तर्फे त्यांना उमेदवारी मिळेल की नाही? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. तर विजय पराडके यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.