प्रतिक्रिया देताना नाना पटोले पुणे Lok Sabha Election 2024 : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुण्यातील सभेत शरद पवार यांचं नाव न घेता 'भटकती आत्मा' अशी टीका केली होती. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, मोदींनी ते स्वतःसाठी बोलले असतील. कारण त्यांनी जे सोमवारी सांगितलं आहे, ते सगळं विश्लेषण त्यांना लागू होतं.
अतृप्त आत्मा महाराष्ट्रात आला आहे :"मोदी हे स्वतःच अतृप्त आत्मा आहेत". कुठे खोक्याचं सरकार आणलं तर कधी दुसऱ्या पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात घेतलं आणि सत्ता बदल केला. लोकांनी निवडून दिलेलं सरकार त्यांनी पाडलं. त्यांची पंतप्रधान होणं ही एकमेव महत्वाकांक्षा आहे. ज्यांचं मन शांत नाही असा अतृप्त आत्मा देशांमध्ये एकमेव आहे. तो सोमवारी महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या रुपात आला होता, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
गुजरातमध्ये जाऊनच प्रचार करा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्याबाबत पटोले म्हणाले की, पंतप्रधान हे एका राज्याचे नाही तर देशाचे आहेत. हे पंतप्रधान फक्त गुजरातचा विचार करतात. कांद्याच्या निर्यातीसाठी ते गुजरातला परवानगी देतात. राज्यातील उद्योग ते गुजरातला घेऊन जातात. या पंतप्रधानांनी राज्यात नव्हे तर गुजरातमध्ये जाऊनच प्रचार केला पाहिजे. पंतप्रधानांची विचार करण्याची क्षमता ही मर्यादित आहे. सोमवारच्या सभेचा जेवढा बाऊ करण्यात आला होता, पण तसं न होता अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. आज लोक त्यांना ऐकत नाहीत.
भाजपामध्ये उमेदवारीवरून वाद : काँग्रेसमधील अंतर्गत वादाबाबत नाना पटोले म्हणाले की, भाजपामध्ये बघा उमेदवारीवरून किती मारामारी आहे. मीडिया मॅनेजमेंट आमच्याकडं कमी पडतंय असं आम्ही मानतो. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. काँग्रेसचे सगळे नेते पुण्यामध्ये काम करतील. जो कसबा निवडणुकीमध्ये रिझल्ट आम्हाला मिळाला त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळेल. आमचा उमेदवार या ठिकाणी बहुमताने निवडून येईल अशा पद्धतीचं वातावरण आहे.
कोणालाही शाप द्यायचा अधिकार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्याबाबत नाना पटोले म्हणाले की, ब्राम्हण समाजात जन्माला आले म्हणून कोणालाही शाप द्यायचा अधिकार त्यांना नाही. आपण ब्राह्मणासारखं वागलं पाहिजे. त्यांची मानसिकता कशी आहे ती आपण गेल्या 2014 ते 2019 मध्ये पाहिली आणि आता ते कसे वागतात तेही आपल्याला माहितीय. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर यांनीच खोटे आरोप लावून 302 चा गुन्हा दाखल केला होता.
एका छोट्या भ्रष्टाचारीने मोठ्या भ्रष्टाचाराचं कौतुक केलं :महाराष्ट्रामध्ये तोडफोडीचा ब्लॅकमेलिंगचा धंदा देवेंद्र फडणीस यांनी सुरू केलाय. शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होतील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. याबाबत पटोले म्हणाले की, राहुल गांधी हे पंतप्रधान होतील असं संजय राऊत म्हणाले होते. आज उद्धव ठाकरेंचं नाव घेत असतील तर ते अशी भूमिका का बदलतात त्यांनाच माहीत. इंडिया आघाडी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. त्यांच्याच नेतृत्वाखालील सरकार देशात येईल. तर सोमवारी पंतप्रधान मोदी यांच्या सभेत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. त्याबाबत नाना पटोले म्हणाले की, भ्रष्टचार करण्यावर काय बोलणार मोदींनी सांगितलं होतं त्यांनी भ्रष्टाचार किती केला आहे. एका छोट्या भ्रष्टाचारीने मोठ्या भ्रष्टाचारीचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा -
- विरोधकांकडून फेक व्हिडिओ तयार करण्याचं काम सुरू-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप - PM Modi Dharashiv visit
- तुमच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा, पंतप्रधान मोदींचा दावा - PM Modi solapur meeting
- पंतप्रधान मोदींच्या 'त्या' विधानावरून तापलं राजकारण; "ते शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना? ", जितेंद्र आव्हाड यांचा सवाल - PM Modi Maharashtra visit