महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मुंबई उत्तर पश्चिम निवडणुकीत ईव्हीएमचे हॅकिंग? काँग्रेसनं निवडणूक आयोगाला विचारले 'हे' दोन प्रश्न - Mumbai North West election - MUMBAI NORTH WEST ELECTION

निवडणुकीत वापरण्यात येणारे ईव्हीएम मशिन हॅक होते का, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला. त्याबाबत राहुल गांधी यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीचे उदाहरण देत एलॉन मस्क यांची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

EVM  controversy
EVM controversy (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 1:14 PM IST

Updated : Jun 16, 2024, 2:04 PM IST

मुंबई- खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्यानं मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन वापरल्याचं प्रकरण आता गंभीर वळण घेत आहे. ईव्हीएम मशीनशी जोडलेला फोनच वायकरांच्या मेहुण्याला वापरायला दिल्याची माहिती आहे. मुंबई उत्तर पश्चिम निवडणुकीतील हा प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत चिंता व्यक्त केली आहे.

रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर पोस्टमध्ये म्हटले, " ईव्हीएम हा एक 'ब्लॅक बॉक्स' आहे. कोणालाही ब्लॅक बॉक्सची छाननी करण्याची परवानगी नाही. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा ( निवडणूक आयोग) संस्थांमध्ये उत्तरदायित्व सांभाळत नाही, तेव्हा लोकशाही केवळ व्यवस्था म्हणून उरते. तेव्हा फसवणूक होण्याची शक्यता असते."

काँग्रेसनं विचारले दोन प्रश्न-मुंबईत महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी जोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यावर काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांना दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसनं म्हटलं, "एनडीए उमेदवाराच्या नातेवाईकाचा मोबाईल हा ईव्हीएमशी का जोडण्यात आला? मतमोजणी केंद्रावर मोबाईल कसा नेण्यात आला? या शंका निर्माण करणाऱ्या पोस्टबाबत भारतीय निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यावे."

आदित्य ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर साधला निशाणा -एकदा गद्दार झालेले हे नेहमीच गद्दार असतात, अशी पोस्ट करत आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाला टोला लगावला. भारतीय निवडणूक आयोगानं मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला. त्यांनी पुन्हा एकदा चंदीगडसारखा प्रसंग टाळल्याचा माझा अंदाज आहे. भाजपा आणि मिंधे टोळीकडून आपली लोकशाही संपविण्याचा प्रयत्न होत असल्याचं आणि घटना बदलण्याचे प्रयत्न होत असल्याचं आम्ही सतत म्हणत आहोत. त्यासाठी सतत गैरप्रकार सुरू आहेत, असा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.

एलॉन मस्क यांच्या आरोपावर केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर-यापूर्वीच टेस्ला आणि एक्स मीडियाचे अध्यक्ष एलॉन मस्क यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत ईव्हीएम सुरक्षित नसल्याचं म्हटलं. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, "इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ही मनुष्य किंवा एआयद्वारे हॅक होण्याचा धोका आहे. त्यामुळे ते काढून टाकले पाहिजेत." त्यावर ईव्हीएमवरील एलॉन मस्क यांच्या विधानात तथ्य नसल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केला. "भारतीय ईव्हीएम मशिन सुरक्षित आहेत. कोणत्याही नेटवर्कपासून स्वतंत्र आहेत. ईव्हीएमला कोणताही मीडिया, ब्ल्यूटूथ आणि वायफाय जोडता येत नाहीत. त्यांची प्रोग्रॅमिंग स्वतंत्र आहे. भारतामधून काही धडे शिका," असा सल्ला चंद्रशेखर यांनी एलॉन मस्क यांनी दिला.

युवा काँग्रेसकडून ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित-भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनी ईव्हीमच्या पादर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची खात्री करणं हे निवडणूक आयोगाचे प्राथमिक घटनात्मक कर्तव्य आहे. नागरिकांच्या मतदानाच्या हक्कांवर विश्वास निर्माण करणे हेदेखील प्राथमिक घटनात्मक कर्तव्य आहे. ईव्हीएममधील गडबडीची चिंता वाटत आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून सत्ताधारी पक्षाच्या हितांना प्राधान्य देत असल्याचे दिसते. अनेक विकसित देश ईव्हीएमवर मतपत्रिका का निवडतात? यावर विचार करण्याची गरज आहे."

हेही वाचा-

  1. अमोल कीर्तिकरांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार - Amol Kirtikar
  2. मुंबई पश्चिम उत्तर लोकसभा मतदारसंघात फेरमतदान घ्या, मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप - Mumbai West North Constituency
Last Updated : Jun 16, 2024, 2:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details