पुणे : आजपर्यंत अनेकांना अनेक छंद असल्याचं आपण पाहिलं आहे आणि तो जोपासताना देखील बघितला आहे. आजपर्यंत चलनात असलेल्या, बंद पडलेल्या नोटा, नाणी हे आपण पहिलंच असेल. परंतु आता पुणेकरांना आपल्या लाडक्या बाप्पाचा दुर्मीळ असा रुपया म्हणजेच नाणं पाहायची संधी उपलब्ध झाली आहे.
'कॉईनेक्स पुणे २०२४' राष्ट्रीय प्रदर्शन : इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स यांच्यातर्फे पुण्यातील कर्वे रोड येथील सोनल हॉलमध्ये 'कॉईनेक्स पुणे २०२४' या राष्ट्रीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या २८ वर्षांपासून नाण्यांचं राष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. यंदा या प्रदर्शनाचं २९ वं वर्ष असून या प्रदर्शनात प्राचीन, मुघल, मराठा, बेरार अशा दुर्मीळ आणि प्राचीन काळातील नाण्यांची वैविध्यता पुणेकरांना बघायला मिळणार आहे.
'गणपती रुपया' पाहण्याची संधी : या प्रदर्शनात इ.स. १७३० मधील सरदार पटवर्धन यांनी मुद्रित केलेला गणपतीचा रुपया देखील पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. याबाबत शाम मोटे म्हणाले की, या प्रदर्शनात दुर्मीळ आणि प्राचीन नाण्यांचं प्रदर्शन मांडण्यात आलं आहे. तसंच यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनात 'गणपती रुपया' हा देखील पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार असल्याचं शाम मोटे म्हणाले.
काय आहे इतिहास 'गणपती रुपया'चा : मराठे शाहीतील एक अत्यंत दुर्मीळ आणि महत्त्वाचं नाणं म्हणजे सरदार पटवर्धन यांनी मुद्रित केलेलं 'गणपती रुपया' नाणं. अठरावं शतक हा मराठ्यांच्या राजकीय उत्कर्षाचा आणि विस्ताराचा काळ होता. पेशवाईच्या काळात मराठेशाही ही दिल्लीपर्यंत पोहोचली होती. मराठी सत्ता जिथं होती तिथं मराठ्यांनी आपल्या अस्तित्वाची छाप टाकली होती. त्याकाळी चलन हे दिल्लीच्या बादशहाच्या नावाने मुद्रित करण्याची पद्धत होती. पण जिथे जिथे मराठ्यांचे राज्य होते तिथे मराठा सरदारांनी स्वतःचा अंमल दर्शवण्यासाठी स्वतःचं भिन्नत्व दर्शक चिन्हं अंकित करून बादशहाच्या नावाने स्वतःचं चलन काढलं. १७३० साली पेशव्यांनी सरदार गोविंदराव पटवर्धन यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल मिरजेचा किल्ला आणि आसपासची काही ठाकाणे दिली होती. गणपती हे पटवर्धनांचं आराध्य दैवत. त्यामुळं पटवर्धनांनी स्वतःच्या प्रदेशात आपल्या गणपती नावाने नाणी मुद्रित केली. ही नाणी पुढे 'गणपती रुपया' म्हणून ओळखली जाऊ लागली. अशी माहिती शाम मोटे यांनी दिली.
नाण्यांच्या दोन्ही बाजूस 'हा' मजकूर : या नाण्यांच्या एका बाजूस फारसी भाषेत शहा आलम बादशाहाच्या नावावरती देवनागरीमध्ये 'श्री गणपती' असा मजकूर येतो, तर दुसऱ्या बाजूस टंकसाळीच्या नावावर 'श्री पंतप्रधान' असा मजकूर येतो. गणपती प्रति अनन्य श्रद्धा आणि पेशव्यांप्रति असलेली दृढ निष्ठा दाखवण्यासाठी पटवर्धनांनी त्यांच्या चलनावर हा मजकूर अंकित केला होता. एकेकाळी आपल्या महाराष्ट्राचे लाडके दैवत गजाननाचे अस्तित्व आपल्या चलनी नाण्यांवर सुद्धा होते. ह्याची ही एक आठवण या प्रदर्शनात मांडण्यात आली असल्याचं मोटे यांनी सांगितलं.
प्रदर्शनात अतिशय दुर्मीळ फ्रेम्सचा संग्रह : शाम मोटे पुढे म्हणाले, "या प्रदर्शनात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी शिक्क्याच्या अर्थात राजमुद्रेच्या विशेष कव्हर, नाणी शिवराई , गणपती पंतप्रधान, तसंच एन्शन्ट, हैदराबाद स्टेटच्या नोटा, बेरर नोटा, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर फिलाटेलिक कवर्स, वराह अवतारवर कॉइन, फॅन्सी कॉईन्स आणि इतर नाणी, नोटा मांडण्यात आल्या आहेत. भारताचा इतिहास पाहता सुमारे तीन ते चार हजार वर्षांपूर्वीपासून भारतात नाणी प्रचलित आहेत. अशी सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीपासूनची म्हणजे इ.स. पूर्व पाचशे वर्षांची नाणी या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात ४० फ्रेम्स लावण्यात आल्या असून अतिशय दुर्मीळ अशा प्रकारचा संग्रह पुणेकरांना बघायला मिळत आहे."
हेही वाचा -
- कोल्हापुरातील 21 दिवसाचा 'पेढा गणपती'; बोंबाडे कुटुंबीयांनी जपली चार दशकांची परंपरा - Ganesh Visarjan 2024
- पुण्यात दुसऱ्या दिवशीही विसर्जन मिरवणूक सुरू, पहा ड्रोन व्हिडिओ - pune ganesh visarjan 2024
- 'लालबागचा राजा' परतीच्या प्रवासाला ; बाप्पाचं खोल समुद्रात विसर्जन, साश्रू नयनांनी भाविकांनी दिला निरोप - Lalbaugcha Raja Visarjan 2024