मुंबई - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाल्यानंतर शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या 'पृथ्वीतलावरचा देवदूत' अशी उपमा संजय राऊत यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, "डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झालं ही देशाची हानी आहे. आपली अर्थव्यवस्था मागच्या दहा वर्षात इतके उपद्व्याप टिकून आहे. सध्याच्या सरकारनं आपल्या अर्थव्यवस्थेला इतके सुरुंग लावले तरी ती टिकून आहे. याच सर्व श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला विरोधी पक्षातील एक नेता म्हणून आणि अर्थतज्ञ म्हणून मनमोहन सिंग यांनी दिलेले सर्व इशारे आतापर्यंत खरे ठरले आहेत. नोटाबंदीमुळे देशाचा जीडीपी घसरेल, असे मनमोहन सिंग म्हणाले होते. ते खरं ठरलं. असे अनेक इशारे त्यांनी दिले आणि ते खरे ठरले."
मुंबईवर त्यांचं विशेष प्रेम -पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "देशाच्या तिजोरीत 15 दिवस पुरेल इतकाच पैसा असताना नरसिंहराव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री केलं. आज नरेंद्र मोदी फुकट धान्य देत आहेत. कोणीही उपाशी राहणार नाही, प्रत्येकाच्या घरात चूल पेटती राहावी, ही योजना मनमोहन सिंग यांची आहे. अन्नसुरक्षा कायदादेखील त्यांनीच आणला. अशा अनेक योजना आहेत. त्यांनी देशाच्या जनतेसाठी आणल्या. अत्यंत प्रामाणिक असा त्यांचा बोलबाला शेवटपर्यंत टिकला. मुंबईवर त्यांचं विशेष प्रेम होतं."
नरेंद्र मोदींची एकही पत्रकार परिषद नाही- "मुंबईतील मेट्रोचं श्रेय मनमोहन सिंग यांना देईन. पहिलं उद्घाटन त्यांनी केलं होतं. तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो. ते पंतप्रधान होते. त्यावेळीदेखील त्यांचा आमच्याशी आणि आमचा त्यांच्याशी करायम संवाद राहिला आहे. विरोधी पक्षात असतानाही आमचा संवाद राहिला. डॉ. मनमोहन सिंग आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा द्वेष न करता त्यांनी देशासाठी काम केलं. त्यांनी कोणाशीही संवाद तोडला नाही. दहा वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी 250 हून अधिक पत्रकार परिषद घेतल्या होत्या. इतक्या कोणत्याही पंतप्रधानांनी घेतल्या नाहीत. नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही", असा टोलादेखील राऊत यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.
पृथ्वीतलावरील ते देवदूत होते- खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, "पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. कोणत्याही प्रश्नांपासून पळून गेले नाहीत. काँग्रेस पक्षाच्या वाढीतदेखील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे स्मरण या देशाला कायम राहील. कारण संकटात सापडलेल्या देशाला आधार देण्याचा काम त्यांनी केलं. ते संसदेत पंतप्रधान असतानाही फार मोकळेपणाने वागायचे. प्रत्येक वेळेला बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरे कसे आहेत, हे विचारायचे. इतका मोठा माणूस आम्हाला ओळखतो की नाही असं वाटायचं. पण, आम्ही समोर गेलो की आम्हाला नावानं ओळखायचे. या पृथ्वीतलावरील ते देवदूत होते", अशी भावूकपणे खासदार संजय राऊत यांनी आठवण सांगितली.
हेही वाचा-
- मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे पंतप्रधान मोदींनी घेतले अंतिमदर्शन, सात दिवसांचा देशात 'राष्ट्रीय दुखवटा'
- मनमोहन सिंग यांच्या निधनानं राजकीय क्षेत्रातून दु:ख व्यक्त; पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्यासह शरद पवार यांनी काय म्हटलं?
- देशाला संकटातून बाहेर काढणारे अर्थमंत्री ते दोनवेळा पंतप्रधान; जाणून घ्या, मननमोहन सिंग यांची कारकिर्द