हैदराबाद : हिंदू धर्ममान्यतेनुसार, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते. मात्र, 2025 वर्षातली माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti) 1 का 2 फेब्रुवारी रोजी साजरी करावी? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
काय आहे शुभ मुहूर्त? : हिंदू पंचांगानुसार, माघी गणेश जयंती शनिवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी शुभ मुहूर्ताची वेळ सुरु होणार आहे. तर, दुपारी 01 वाजून 40 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे. तर, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 14 मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहील. या काळात गणेशाची विधीवत पूजा केली जाते.
पूजा कशी करावी : माघी गणेश जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि शुभ्र स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर एका चौरंगावर लाल कपडा अंथरून घ्या. देवघर किंवा पूजा स्थळ फुलांनी आणि दिव्यांनी सजवा. त्यानंतर गणपतीला जल, दूध, मध आणि दह्याने अभिषेक करा. गणपतीला स्वच्छ पुसून लाल कपड्यावर अक्षदा ठेवून त्यावर बाप्पाची मूर्ती ठेवा. गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखवा. तसेच गणपतीला प्रिय असलेली जास्वंदाची लाल फुले, दूर्वा व्हाव्यात, नैवेद्य म्हणून तिळगुळ किंवा त्याचे लाडू किंवा मोदक अर्पण करा. या दिवशी चुकूनही चंद्र दर्शन घ्यायचं नसतं. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तीलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
माघी गणेश जयंतीला विशेष महत्त्व : माघ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला अशी पौराणिक मान्यता आहे. म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यादिवशी पती-पत्नीने संतान सुखासाठी व्रत, उपासना केल्यास त्याचा त्यांना लाभ होईल अशी मान्यताआहे.
(टीप: सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, 'ईटीव्ही भारत' यातील माहितीच्या सत्यतेचा दावा करत नाही.)
हेही वाचा -
कधी आहे वर्षातील पहिली अमावस्या? पितरांच्या शांतीसाठी मौनी अमावस्येच्या दिवशी 'या' वस्तूचं करा दान