सातारा : दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेक आणि तुंबळ हाणामारीमुळं साताऱ्यातील बोगद्यानजीकच्या जकातवाडी परिसरात गुरूवारी दिवसभर तणावाचं वातावरण होतं. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. याप्रकरणी सातारा ग्रामीण पोलिसांनी धरपकड करत दोन्ही गटातील १० जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी पोलिसांनी सशस्त्र संचलनही केलं.
जुन्या भांडणावरून वाद उफाळला : वस्ताद नगरमधील दोन गटात जुना वाद होता. त्याचं कारण आणि महिलेची छेड काढल्याचं निमित्त होऊन दोन गटांमध्ये गुरूवारी तुंबळ हाणामारी झाली. यामुळं जकातवाडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. वादाची कुणकुण लागल्यामुळं सातारा ग्रामीण पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सौम्य लाठीमार करत १० जणांना ताब्यात घेतलं.
नेमका वाद काय? : जकातवाडी (ता. सातारा) येथील वस्ताद नगरमध्ये दोन समाजांमध्ये गेली वर्षभर जुना वाद धुमसत होता. त्यात निवडणुकीतील भांडणाचीही भर पडली होती. अशातच गुरुवारी एका समाजाच्या एका महिलेची छेड काढल्याचं निमित्त होऊन भर रस्त्यावर दोन गट लाकडी दांडक्यांसह शस्त्रे घेऊन एकमेकांच्या अंगावर धावले. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली.
हाणामारीची माहिती मिळताच पोलिसांची धाव : जकातवाडी परिसरातील राड्याची माहिती मिळताच सातारा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे, सातारा शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि जलद कृती दल घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी जकातवाडी परिसराची नाकाबंदी केली. दुपारी चारपर्यंत धरपकड करत पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतलं. जागेतून ये-जा करण्यावरुन वाद होता. त्यात एका महिलेची छेड काढल्यानं हा राडा झाल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं.
पोलिसांचं सशस्त्र संचलन : सातारा शहर आणि सातारा ग्रामीण पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं जकातवाडी गावातून संचलन केलं. घटनास्थळावरून एक चारचाकी गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली. धरपकड केलेल्या १० जणांना सायंकाळी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत परस्परविरोधी फिर्यादी नोंद करण्याची कारवाई सुरू होती.
हेही वाचा :