मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठ्या ट्रॅव्हल ट्रेड प्रदर्शनाला मुंबईत आजपासून सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात जगभरातील टुरिस्ट इंडस्ट्रीशी संबंधित व्यावसायिक मुंबईच्या बीकेसी येथील जिओ सेंटरमध्ये आले आहेत. या वर्षीच्या OTM म्हणजेच आउटबाउंड ट्रॅव्हल मार्ट प्रदर्शनात 1 हजार 600 हून अधिक स्टॉल धारक सहभागी झाले आहेत. तर 4 हजारहून अधिक पर्यटक प्रदर्शनाला भेट देण्याची शक्यता आहे. या प्रदर्शनात रामोजी फिल्म सिटीचा (Ramoji Film City) देखील स्टॉल असून स्टॉलवर अनेकजण उत्सुकतेने भेट देत आहेत.
रामोजी फिल्म सिटीच्या स्टॉलला भेट : आशिया खंडातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणजे 'रामोजी फिल्म सिटी'. येथे अनेक पर्यटक वन स्टॉप डेस्टिनेशनच्या नियोजनाने येतात. यावेळी आम्ही रामोजी फिल्म सिटीच्या स्टॉलला भेट देणाऱ्या काही पर्यटकांची संवाद साधला. त्यावेळी, रामोजी फिल्म सिटी म्हणजे एक पॅकेज असल्याचं पर्यटकांचं म्हणणं आहे. इथे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार राहण्याची व्यवस्था आणि इतर ऍक्टिव्हिटी आहेत. "आम्ही काही वर्षांपूर्वी रामोजी फिल्म सिटीला भेट दिली होती. येथे अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सेट आहेत. ते सेट व्हिजिट करताना आपण वेगळ्याच अशा दुसऱ्या शहरात असल्याचा भास होतो आणि आपण त्या चित्रपटाचा एक भाग आहोत असं जाणवायला लागतं," अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी दिली.
साडेतीन हजाराहून अधिक चित्रपटांचं चित्रीकरण : या स्टॉलची माहिती देताना रामोजी फिल्म सिटी समूहाचे जनरल मॅनेजर हरी नायर यांनी सांगितलं, "आशिया खंडातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून या रामोजी फिल्म सिटीचा नावलौकिक आहे. इथे आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक चित्रपटांचं चित्रीकरण झालय. यातील काही चित्रपट अजरामर आहेत. यांचे सेट आजही तुम्हाला येथे पाहायला मिळतात. बाहुबली चित्रपटाचा सेट इथलं विशेष आकर्षण आहे. या फिल्म सिटीमध्ये एकूण पाच हॉटेल असून, इथे तुम्ही तुमच्या बजेटनुसार राहू शकता. तुम्हाला जर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचं असेल तर सितारा हॉटेल आहे. तुमच्या बजेटनुसार 1000 रुपयामध्ये देखील येथे राहण्याची व्यवस्था आहे. तुम्ही तुमच्या शाळेच्या सहली मित्रपरिवारासह इथे भेट देऊ शकता".
18 साहसी खेळ खेळण्याची व्यवस्था : पुढे बोलताना हरी नायर यांनी सांगितलं, " रामोजी फिल्म सिटीमध्ये एक नव्याने आपण थीम पार्क सुरू केलं असून, इथे तुम्हाला विविध साहसी खेळ खेळता येतात. यामध्ये झिप लायनिंग, रायफल शूटिंग यासह अन्य साहसी खेळ खेळता येतात. इथे एकूण 18 साहसी खेळ खेळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे देखील आशियातील एक फाईनेस्ट एडवेंचर डेस्टिनेशन आहे. या एडवेंचरसाठी एक विशेष सेक्शन असून त्याला साहस असं नाव देण्यात आलं आहे. तुम्हाला जर टीम बिल्डिंग करायची असेल किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये टीम वर्क रुजवायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे".
हेही वाचा -