मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग मालवणमधील पुतळा (Shivaji Maharaj Statue) काही दिवसांपूर्वी कोसळला होता. जो पुतळा पडला तो केवळ 8 महिन्यांपूर्वी बसविण्यात आला होता. हा महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारच्या विरोधात समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांनी यावरून टीका करत सरकारला चांगलंच घेरलं होतं. त्याचबरोबर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या टीकेला सरकार जोरदार उत्तर म्हणून वलकरच दिमाखदार पुतळा उभारण्याच्या तयारीत आहे.
महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला सुरुवात : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यानंतर त्याठिकाणी नवीन भव्यदिव्य पुतळा उभारू असं महायुती सरकारनं आश्वासन दिलं होतं. त्यामुळं आता पुतळ्याच्या चौथऱ्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा पुतळा किती फूट उंच असणार? पुतळ्याचं वैशिष्ट्य काय? पुतळ्याचं कशा प्रकारे काम होणार? पुतळा कोण तयार करणार? असे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केले जात आहेत.
पुतळ्यावरून आरोप-प्रत्यारोप : विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गमधील राजकोट येथील पुतळा पडला होता. अत्यंत निकृष्ट दर्जाचा हा पुतळा केला होता. हा पुतळा पडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "हवेच्या वेगाने पुतळा पडल्याचं म्हटलं होतं." यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच कोंडीत पकडलं होतं. समुद्र किनाऱ्यावर अनेक पुतळे बसवले आहेत. ते आजही डौलाने उभे आहेत. मात्र केवळ 8 महिन्यापूर्वी बसवलेल्या पुतळ्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मर्जीतील लोकांना कंत्राट दिलं होतं. या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्यामुळेच हा पुतळा पडल्याची टीका विरोधकांनी केली.
मराठी माणसासाठी अस्मितेचा विषय : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराज म्हणजे मराठी माणसासाठी अस्मितेचा विषय आहे. त्याच महाराजांचा पुतळा पडल्यानंतर संतप्त जनभावना उमटल्या होत्या. सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. निवडणुकीत महायुतीला पुतळा पडल्याचा फटका बसेल, असं बोललं जात होतं. पुतळ्यावरून गेल्या काही दिवसांपूर्वी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा आणि खडाजंगी पाहायला मिळाली. त्यावेळी महायुती सरकारनं महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारू असं आश्वासन दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन पुतळ्या पडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्याच ठिकाणी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यामुळं हा पुतळा कसा असणार? याची उत्सुकता शिवप्रेमी आणि मराठी माणसांमध्ये आहे. यासंदर्भात या पुतळ्याचं काम करणारे ज्येष्ठ शिल्पकार अनिल राम सुतार यांनी 'ईटीव्ही भारत'ला एक्स्लूझिव्ह माहिती दिली. अनिल सुतार हे जगप्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र आहेत.
"राजकोट येथील पुतळा बांधण्यासाठी सपोर्टसाठी वापरण्यात आलेलं लोखंड योग्य नव्हतं. त्यामुळं वादळ किंवा जोरात हवा आल्यामुळं त्याच्यावर ताण आला, परिणामी पायाजवळील लोखंड तुटलं आणि पुतळा कोसळला. आम्ही पुतळे बनवताना आयआयटी किंवा मोठ्या संस्था जसे की दिल्ली, मुंबई येथील इंजिनियर आमच्यासाठी डिझाईन करतात. आम्ही मोठं मोठे पुतळे करतो. त्यांचही स्ट्रक्चरल डिझाईन आमचे इंजिनियर करतात. आम्ही आयआयटीकडून स्ट्रक्चरल डिझाईन करून घेतलं आहे, आता ते अप्रूव्ह झालं आहे. आम्ही कांस्य धातूपासून हा पुतळा बनवत आहे". - अनिल राम सुतार, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र
मार्चपर्यंत पुतळा तयार करणार : अनिल राम सुतार पुढे म्हणाले, "शिवाजी महाराज यांचा पुतळा हा आधीपेक्षा मोठा असेल. जो पुतळा पडला तो 22 फूटांचा होता. नवीन पुतळा 60 फुटाचा करायला सांगितला आहे. पुतळ्याची आणि तलवाराची उंची पाहता पुतळ्याची एकूण उंची ही 75 फूट असणार आहे. या पुतळ्यासाठीचा चबुतरा 10 फुटांचा असणार आहे. आमच्या हाती आताच काम सुपूर्द केलं आहे. पूर्वीचा चबुतरा आणि पुतळा काढला आहे. मार्च 2025 पर्यंत नवीन पुतळ्याचं काम पूर्ण होईल. आमचं सौभाग्य आहे की, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं काम करायला मिळत आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील 125 फूटांचा पुतळा हैदराबाद येथे करून दिला आहे. तर आता मुंबईसाठी 350 फुटांचा पुतळा करणार असल्याचं शिल्पकार अनिल राम सुतार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा -