मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं. मंत्रिमंडळ विस्तार, शपथविधी, खातेवाटप, मंत्र्यांना बंगले आणि मंत्रालयातील दालने याचं वाटप करण्यात आलं. एकीकडं मंत्र्यांच्या बंगला वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांना बंगले न मिळाल्यामुळं आणि फ्लॅट मिळाल्यामुळं ते नाराज असताना, दुसरीकडं मात्र मंत्रालयातील रूम नंबर 602 वरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्रालयातील 602 रूम ही कोणीही मंत्री घ्यायला इच्छुक नसतात. कारण, या रूमचा एक वेगळाच आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. तसंच मंत्रालयातील 602 रूमसह रामटेक बंगल्याबाबतही (Ramtek Bungalow) असंच बोललं जातय. कारण रामटेक बंगल्यात राहणाऱ्या मंत्र्याला कालांतराने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो, असा समज आहे.
मंत्रालयातील रूम नंबर 602 चा नेमका इतिहास? : श्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या हिंदोळ्यावर रामटेक वास्तू आणि रूम नंबर 602 दालन आहे. रामटेक बंगला आणि रूम नंबर 602 हे दोन्ही मंत्र्यांसाठी अनलकी मानले जात आहे. या ठिकाणी जो मंत्री राहतो त्याला कोणत्या तरी विपरीत गोष्टीचा सामना करावा लागतो. कोणत्या ना कोणत्या कारणामुळं अडचणी येऊन त्याला राजीनामा द्यावा लागतो. किंवा अन्य गोष्टीचा सामना करून पदाचा त्याग करावा लागतो असं इतिहास सांगतो. दरम्यान, रामटेक बंगला आणि मंत्रालयातील रूम नंबर 602 चा नेमका इतिहास आहे तरी कसा? यापूर्वी या दोन्हीमध्ये कोण-कोण राहिले आहेत? आणि त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आहे? यावर पाहूया स्पेशल रिपोर्ट.
रामटेक बंगल्याचा इतिहास काय सांगतो? : मंत्रालयातील रूम नंबर 602 ची चर्चा सुरू आहे. तर आता या रूमवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडं रामटेक बंगलासुद्धा 602 रूम प्रमाणेच अनलकी किंवा अशुभ असल्याचं बोललं जात आहे. कारण रामटेक बंगल्याचा इतिहास हा 602 रूमपेक्षा काही वेगळा नाही. इथे राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारमध्ये सुरुवातीला छगन भुजबळ राहायला गेले होते. परंतु त्यांना स्टॅम्प घोटाळ्यामुळं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि तुरुंगवास झाला. यानंतर रामटेकमध्ये अजित पवार राहायला गेले. मात्र त्यांचं सिंचन घोटाळ्यात नाव समोर आलं आणि त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. पुढे महायुती सरकारमध्ये माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे रामटेक बंगल्यात राहायला होते. पण आताच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री पदच देण्यात आलं नाही. केसरकरांना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं. त्यामुळं मंत्रालयातील रूम नंबर 602 जशी अशुभ आणि अनलकी मानली जाते. त्याचप्रमाणे रामटेक बंगला देखील मंत्र्यांसाठी अशुभ आणि अनलकी मानला जातोय.
"कुठलंही दालन किंवा मंत्र्यांचा बंगला अशुभ नसतो. हे केवळ आपल्या मानण्यावर आहे. पुरोगामी महाराष्ट्रात म्हणजे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात आपण राहतो. अशी अंधश्रद्धा किंवा गैरसमज बाळगणं चुकीचं होईल. कुठलाही माणूस स्वतःच्या कर्तृत्वानं मोठा होतो. 602 रूममुळं मंत्री अडचणीत येतो किंवा रामटेक बंगल्यात राहायला गेल्यामुळं त्या मंत्र्याला कुठल्यातरी कारणावरुन राजीनामा द्यावा लागतो. हा चुकीचा समज आणि अंधश्रद्धा आहे." - दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते आणि ज्योतिषी
निव्वळ अंधश्रद्धा : सध्या माध्यमात मंत्रालयातील 602 रूमबद्दल बरीच चर्चा आहे. या रूमबाबत राजकीय वर्तुळात देखील चर्चा आहे. 602 रूमचे दालन मिळाल्यानंतर मंत्रिपद अडचणीत येतं असं बोललं जात आहे. पण मी सुद्धा 602 या दालनात बसून काम केलय. पण मला कधी असा अनुभव आला नाही. ही केवळ अंधश्रद्धा आणि गैरसमज आहे. माझ्या दृष्टीनं माणूस आपल्या कर्तृत्वानं मोठा होतो. मी इथे होतो, त्यानंतर मी राज्यसभेवर खासदार म्हणून गेलो. त्यामुळं हा केवळ गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरवली गेली आहे, असं माजी कृषीमंत्री आणि मंत्रालयातील 602 रूमच्या दालनात काम केलेले अनिल बोंडे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.
"सध्या महाराष्ट्रात 288 आमदार आहेत आणि त्यापैकी एका आमदाराला म्हटलं की, आम्ही तुला मंत्री करतो पण तुला मंत्रालयातील 602 दालन मिळेल. तर तो आमदार नाही म्हणणार आहे का? आपणाला 602 रूमचं दालन मिळालं तरी चालेल पण मंत्री होता येतं, म्हणून तो आमदार ते दालन स्वीकारेल. याचाच अर्थ काय शेवटी शुभ-अशुभ आणि चांगलं-वाईट हे आपल्या मानण्यावर आहे." - अनिल बोंडे, माजी मंत्री
हे प्रतिगामी बुरसटलेले विचार : "राजकारणात आणि समाजकारणात अनेक गैरसमज आणि अफवा पसरवल्या जातात. तुम्ही एखाद्या गावाला भेट दिली किंवा एखाद्या व्यक्तीची भेट घेतली तर तुमच्या बाबतीत वाईट घडतं. अशा अफवा पसरवल्या जातात. आता मंत्रालयातील 602 रूम आणि रामटेक बंगल्यावरून चर्चा होत आहे. या दोन्ही ठिकाणातील मंत्र्यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागतं असं बोललं जातय. मात्र या केवळ अफवा आणि गैरसमज आहे. दरम्यान, अशीच अफवा यापूर्वी पसरवली गेली होती. पुरातन या बंगल्यावर माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचं भूत दिसतं असं बोललं जात होतं. मात्र त्याकाळी माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांनी तो बंगला स्वीकारला आणि त्या ठिकाणी जी काय भुताटकी आहे, ती मी बघतो असं म्हणून राहायला गेले. असाही एक महाराष्ट्राच्या राजकारणात अंधश्रद्धेबाबत किस्सा घडलेला आहे. परंतु, आता रामटेक बंगला असो किंवा मंत्रालयातील 602 रूमबाबत जे बोललं जात आहे. तो केवळ गैरसमज आहे. आता मंत्रालयात मंत्रिपदाचा पदभर स्वीकारताना मंत्र्यांकडून पूजा अर्चा केली जाते. हे आता भाजपा-शिवसेना करते. कारण ते स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणतात. त्यामुळं त्यांना ते करावं लागतं. पण एकीकडं पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि दुसरीकडं अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवायचा? हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळं प्रतिगामी बुरसटलेल्या विचारातून आपण बाहेर पडणं गरजेचं आहे". अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली आहे.
कुठलीही वास्तू वाईट नसते : महायुतीचं मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि दालन वाटप करण्यात आलं आहे. मात्र शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं ते सध्या नाराज आहेत, असं बोललं जातय. आपण रामटेक बंगल्यात राहायला होता म्हणून आपलं मंत्रिपद गेलं का? किंवा रामटेक बंगला हा अशुभ मानला जातोय का? असा प्रश्न केसरकरांना विचारला असता ते म्हणाले, "रामटेक बंगल्यात यापूर्वी मी राहायला होतो. या बंगल्यात अनेक मंत्री राहिले आहेत. याची मी यादी दिली आहे. शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ असे कित्येक नेते या बंगल्यात राहायला होते. शेवटी कुठलीही वास्तू अशुभ किंवा वाईट नसते. ते आपल्या मानण्यावर आहे. वास्तूची आपण सेवा केली पाहिजे, पूजा केली पाहिजे तरच आपण यशस्वी होतो. आपण स्वतः वास्तूला दोष देण्यात काही अर्थ नाही. रामटेक चांगला बंगला आहे. मी तिथे राहिलो आहे. शेवटी शुभ-अशुभ किंवा चांगले-वाईट हे मानण्यावर असते."
हेही वाचा -
- मुख्यमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच; राजकीय चर्चांना उधाण - Future CM Controversy
- निवडणुकीची घाई..! दररोज शंभरहून जास्त शासन निर्णयांचा सपाटा, आचारसंहितेपूर्वी मंत्रालयात गजबजाट - Government Decisions
- महाराष्ट्राच्या मंत्रालयातील नवा बनावट कागदपत्रांचा स्कॅम उघड, गृह विभागाच्या उपसचिवाला केलं निलंबित