मुंबई -देशाच्या आर्थिक राजधानीत मागील काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. नुकतेच कुर्ल्यात एका बस अपघातात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघाताची घटना ताजी असतानाच कुर्ल्याच्या बाजूलाच असलेल्या घाटकोपरमध्ये शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात घडला आहे. घाटकोपर पश्चिमेकडील चिरागनगर बाजारात एका भरधाव टेम्पोनं सहा ते सात जणांना चिरडलं आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. प्रीती पटेल (वय 35, राहणार घाटकोपर, पश्चिम) असे मृत्यू झालेल्या महिलेच नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो चालकाचे वाहन चालवत असताना स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले. त्याने रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडलं आहे. उत्तम बबन खरात ( वय २५ ) असं टेम्पो चालकाचं नाव आहे. या अपघातानंतर टेम्पो चालक उत्तम खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा अपघात कसा घडला, याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. रेश्मा शेख (23 वर्षे), मारुफा शेख (27 वर्षे), तोफा उजहर शेख (38 वर्षे), मोहरम अली अब्दुल रहीम शेख (28 वर्षे) हे चारजण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात- झोनल पोलिस उपायुक्त (डीसीपी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6.30 च्या सुमारास नारायण नगर येथून कोल्ड्रिंक घेऊन टेम्पो भरधाव वेगाने जात होता. टेम्पो चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील टेम्पोनं पादचाऱ्यांना धडक दिली. अपघातात टेम्पो चालक उत्तम बबन खरात हा जखमी झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून टेम्पो जप्त करण्यात आला आहे." प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार लोकांनी आरोपीला पकडून घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिले. वाहनांनी पादचाऱ्यांना चिरडण्याच्या अपघातात वाढ होत असल्यानं रस्त्यावरून कसे चालावे, असा मुंबईकरांसमोर प्रश्न आहे.
चालक मद्यधुंद असल्याचा स्थानिकांचा दावा- घाटकोपरमधील चिरागनगरमध्ये भाजी मार्केट आणि माशांचे मार्केट आहे. या ठिकाणी नेहमी लोकांची वर्दळ असते. त्यामुळे गाडी चालवताना काळजीपूर्वक गाडी चालवली पाहिजे, असं स्थानिकांचे म्हणणं आहे. परंतु हा घडलेला अपघातात चालकानं मद्यपान केल्यामुळे झाल्याचा स्थानिकांनी आरोप केला. चालकानं भरधाव टेम्पो चालवत मार्केटमध्ये घुसवून काही स्टॉल्सला उडवून लावले. यानंतर टेम्पोनं पादचाऱ्यांना चिरडले. या घटनेनंतर पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा-