चंद्रपूर/पुणे - राज्यात पुणे, कोल्हापूरपाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचा (GBS Maharashtra updates) शिरकाव झाला आहे. 14 वर्षीय मुलीला जीबीएसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या 170 वर पोहोचली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथील 14 वर्षाच्या मुलीला जीबी आजाराची लागण झाल्याची माहिती नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चंद्रपूर जिल्हा आरोग्य यंत्रणेला नुकतीच मिळाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
गावाचं करण्यात आलं सर्वेक्षण- जीबीएस रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभागाद्वारे चेकठाणेवासना येथे सर्वेक्षण करण्यात आलं. चेकठाणेवासना गावातील 192 घरांना भेटी देऊन 904 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासणीमध्ये एकही जीबी आजारसदृश्य रुग्ण दिसून आला नाही. गावातील 11 पाणी नमुने जैविक तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. ग्रामपंचायतमधील ब्लिचिंग पावडरचे नमुनेदेखील चंद्रपूर येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत. जीबीएस आजाराची लागण झालेल्या मुलीच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता त्यांनी रुग्णाची परिस्थिती सुधारत असल्याचं सांगितलं. रुग्णांना लवकरच रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार असल्याचं नातेवाईकांनी कळविल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी दिली.
राज्यातील जीबीएस रुग्णसंख्या 170- जीबीएसच्या प्रादुर्भावाचे केंद्र असलेल्या पुणे शहराजवळील नांदेड गाव परिसरातील 19 खासगी आरओ प्लांट पुणे महापालिकाप्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. कारण, तेथील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं चाचण्यांमधून निष्पन्न झाल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी. यांनी माहिती दिली. पुणे जिल्ह्यात जीबीएसचे चार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील जीबीएस एकूण रुग्णांची संख्या 170 झाली आहे.
पाणी पुरवठ्यासाठी एसओपी- धायरी-नांदेड परिसरात असलेल्या खासगी आरओ प्लांटमधून परिसरातील लोकांना बाटलीबंद पाणी पुरवठा केला जात होता. नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होऊ नये, याकरिता पुणे महानगरपालिकेनं एसओपी जाहीर केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले," नांदेड गावातील 19 आरओ प्लांटमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये एस्चेरिचिया कोलाय बॅक्टेरिया आढळले आहेत. त्यामुळे खासगी पाणी पुरवठादारांना ब्लीचिंग पावडर सोल्यूशनचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे."
हेही वाचा-