मुंबई : चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीच्या अपघाताची एक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी रात्री घाटकोपरमध्ये एका टेम्पोनं पाच जणांना उडवलं होतं. यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, आता मुंबईच्या कांदवलीतील पोईसर मेट्रोस्टेशन जवळ अभिनेत्री ऊर्मिला कोठारेच्या (Urmila Kothare) गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीनं दोघांना उडवलं असून, एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चालकाविरोधात गुन्हा दाखल : शुक्रवारी रात्री अडीच वाजता अभिनेत्री ऊर्मिला कोठारे ही शूटिंग करून घरी जात असताना कांदवली परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ काही कामगार काम करत होते. यावेळी ऊर्मिलाच्या गाडीच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं मेट्रोचं काम करणाऱ्या कामगारांना गाडीनं धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीररित्या जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर समता नगर पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पुढील तपास पोलीस करत आहेत.
गाडीचा झाला चक्काचूर : गाडी अतिशय जलदगतीनं आल्यामुळं मजुरांना धडक दिली. त्यामुळं लाल रंग असलेल्या गाडीच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. दरम्यान, अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग्ज उघडल्यानं ऊर्मिलाचा जीव थोडक्यात बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र या अपघातात अभिनेत्री ऊर्मिला कोठारे ही जखमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अपघाताच्या घटनात वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी घाटकोपरमधील अपघात झाला असताना त्याच रात्री अभिनेत्री ऊर्मिला कोठारे हिच्या गाडीचा अपघात झाला.
हेही वाचा -