सातारा : लाडकी बहीण योजनेला राजकीय जुमला म्हणून हिणवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना धडा शिकवा, असं आवाहन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलं. त्याला प्रत्युत्तर देताना "कमळ हे दलदलीत उगवतं, कराडचा भाग सखल असल्यानं इथं कमळ कधीच उगवलेलं नाही," असा टोला शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारेंनी लगावला.
कोरोना काळात पृथ्वीराज चव्हाण काय करत होते? :कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलताना कोरोना काळात अतुल भोसले यांनी लोकांना सेवा दिली. त्यावेळी विद्यमान लोकप्रतिनिधी पृथ्वीराज चव्हाण काय करत होते? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. महाविकास आघाडीचे नेते रेटून खोटे बोलणारे चोर आणि लुटेरे असल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केला.
काँग्रेसनं महिलांसाठी काय केलं? : देशात 70 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसनं महिलांसाठी काय केलं? असा सवाल करून चित्रा वाघ म्हणाल्या, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्वला योजना, जनधन योजना, मोफत धान्य, लखपती दीदी योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. महाराष्ट्रातील महायुती सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना राबवली. मात्र, ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेलेल्या सावत्र भावांना या निवडणुकीत महिलांनी जागा दाखवावी."