पुणे Lok Sabha Elections : राज्यातील महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशातच काही ठिकाणी महायुतीतील नेत्यांमध्ये संघर्ष वाढत असल्याचं दिसून येतय. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवत बारामतीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. यावरून महायुतीतील द्वंद उफाळून येत आहे. असं असतानाच आता 'शिवसेना नव्हे तर भाजपानं मला उमेदवारी द्यावी' असा प्रस्ताव शिवतारे यांनी केला आहे.
काय म्हणाले विजय शिवतारे : यासंदर्भात ईटीव्ही भारतने घेतलेल्या मुलाखतीत बोलत असताना विजय शिवतारे म्हणाले की, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. दोन दिवसांमध्ये हजारो लोकांचे मला फोन आले. ते म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत या धर्मयुद्धात तुम्ही कमी पडू नका, आणि अशा परिस्थितीत जर मी माघार घेतली तर मी विधानसभेसाठी सेटलमेंट केली अशा चर्चा सुरू होतील. विशेष म्हणजे जनसामान्यांच्या विश्वासाला जर मी अपात्र ठरलो आणि माघार घेतली तर लोकशाही मधील सर्वात मोठी हानी माझी आणि लोकांची होणार आहे. म्हणून मी माझ्या भूमिकेवर ठाम असून मी निवडणूक लढवणारच असल्याचं यावेळी शिवतारे यांनी स्पष्ट केलं.