मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांना आणि दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या 150 हून अधिक पुरवठादारांनी आजपासून (13 जानेवारी) औषधांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मागील चार महिन्यांपासून 120 कोटी रुपयांची बिले थकवल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशनचं म्हणणं आहे. त्यामुळे याचा परिणाम पालिके अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमधील औषध पुरवठ्यावर होणार आहे.
मुंबईची सार्वजनिक रुग्णालयांची आरोग्य व्यवस्था ही अत्यावश्यक औषधांसाठी 150 हून अधिक औषध आणि अन्य सुविधा पुरवठादारांवर अवलंबून आहे. केईएम, सायन आणि कूपर, नायरसारखी पालिका रुग्णालये दररोज हजारो रुग्णांना सेवा देतात. या रुग्णालयांमध्ये केवळ मुंबईतीलच नाहीतर मुंबई बाहेरूनदेखील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. या सर्व औषध पुरवठादारांनी महापालिकेकडून थकीत बिले मिळेपर्यंत औषधांचा पुरवठा केला जाणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रुग्णांना औषधांसाठी तारेवरची कसरत करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
काय आहे पुरवठादारासह प्रशासनाची भूमिका?ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले की, " आमच्या संघटनेतील औषध पुरवठादार सदस्य आज आर्थिकदृष्ट्या उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. थकीत बिले मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण, पालिकेकडून होणारा विलंब आता असह्य झाला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्यानं पालिका रुग्णालयांना औषध पुरवठा करणं आता आमच्यासाठी कठीण बनलं आहे. त्यामुळे भविष्यात जी काही परिस्थिती निर्माण होईल, त्याला पालिका प्रशासन जबाबदार असेल." अशी भूमिका अभय पांडे यांनी जाहीर केली आहे. दरम्यान, याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला जात असल्याचं म्हटलं आहे. या बिलांचे सर्व तपशील तपासले जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास कुऱ्हाडे यांनी व्यक्त केला.
- बृहन्मुंबई महानगरपालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक महापालिका आहे. महापालिकेचं वार्षिक बजेट देशातील कोणत्याही महापालिकेच्या तुलनेत सर्वाधिक आहे. देशातील काही राज्यांच्यापेक्षाही महापालिकेचं बजेट जास्त आहे. त्यामुळं बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून औषध पुरवठादारांची बिले थकित राहिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेही वाचा-