नवी मुंबई- कोपरी पुलाखालील सर्व्हिस रोडवरून बोनकोडेच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला स्कोडा गाडीने जोरदार धडक दिल्याने दोन तरुणींचा करुण अंत झालाय. विशेष म्हणजे स्कुटीला धडक दिल्यानंतर स्कोडा गाडीचा चालकाने जागेवरून पळ काढलाय. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. एपीएमसी पोलीस स्कोडा गाडीचालकाचा शोध घेत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण : संबंधित घटना रविवारी सकाळी पावणे सातच्या दरम्यान घडली. कामोठे येथे राहणारी संस्कृती खोकले (22) आणि अंजली सुधाकर पांडे (19) या दोन मैत्रिणी तुर्भे एमआयडीसी येथील कॉल सेंटरमध्ये कामाला होत्या. रात्रीची नाईट शिफ्ट करून या दोघी कामावरून सुटल्या. संस्कृती खोकले ही दररोज कामोठे ते तुर्भे एमआयडीसी येथे तिच्या दुचाकीवरून प्रवास करीत असे आणि तिची मैत्रीण अंजली पांडे ही कोपरखैरणे परिसरातील बोनकोडे येथे राहत होती. तिला संस्कृती तिच्या घरी सोडायला जात होती. कोपरी पुलाखालील सर्व्हिस रोडवरून बोनकोडे येथे जात असताना सकाळी पावणे सातच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला स्कोडा गाडीने उडवल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झालाय.
तरुणींना उडवल्यानंतर कारचालकाने काढला पळ : स्कोडा कारने धडक दिल्यानंतर संस्कृती खोकले (22) या तरुणीला वाशी येथील मनपा रुग्णालयात नेत असताना 'मृत' घोषित करण्यात आलंय. तर मागे बसलेली अंजली पांडे (19) हीदेखील गंभीर जखमी झाल्याने तिलाही मनपा रुग्णालयात नेण्यात आलंय. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झालाय. कोपरी पुलाजवळील ट्रॅफिक सिग्नलवर स्कूटर चुकीच्या बाजूने नेल्याने कार आणि स्कूटरची समोरासमोर टक्कर झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या अपघातानंतर कार चालक पळून गेलाय. कार चालकाविरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीसीटीव्ही फुटेजवरून संबंधित स्कोडा कारचा नोंदणी क्रमांक मिळालाय, असे एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितलंय. कारच्या क्रमांकावरून ही कार डोंबिवली येथील व्यक्तीची असल्याची माहिती मिळालीय. मालक डोंबिवली येथे राहतो. पोलीस संबंधित कार चालकाचा शोध घेत आहेत.
हेही वाचा-