जळगाव- येत्या महापालिका निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. गुलाबराव पाटील यांनी जळगावात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेंचे उत्कृष्ट मार्गदर्शक असलेल्या संजय राऊत यांना स्वप्न पडले असेल, त्यानुसार त्यांनी या सूचना उद्धव ठाकरेंना केल्या असतील. कदाचित हे स्वप्न त्यांना मागच्या काळात पडलं असतं, तर शिवसेनेची अशी वाताहात झाली नसती," असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावलाय.
शिवसेनाप्रमुखांचं स्मारक हे माझं- "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की, देशावर आणि राज्यावर हिंदुत्व विचारांचं सरकार यावं, राम मंदिर व्हावं, ते पूर्ण झालंय. मात्र त्याच काळात या माणसाने (उद्धव ठाकरे) शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडलेले आहेत. रामदास कदम जे बोललेले आहेत, ते अगदी सत्य आहे. जागा कोणाची यापेक्षा त्या ठिकाणी शिवसेनाप्रमुखांचं स्मारक आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सर्वांचा हक्क आहे. त्यामुळे कोणी म्हणू शकत नाही की शिवसेनाप्रमुखांचं स्मारक हे माझं आहे. मालकी हक्क हा सर्वांचा आहे. ते त्यांचे नेते आहेत, ते त्या पद्धतीने मागणी करतील, त्यानुसार उद्धव ठाकरे साहेब विचार करतील," असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.
ठाकरे भाजपाबरोबर येणार? - ठाकरेंनी भाजपाबरोबर येण्याबद्दल वाद नाही. परंतु मागच्या काळात त्यांनी भाजपाला मदत करायला हवी होती, त्या काळात ते भाजपाला सोडून निघून गेले. पण ज्या काळात भाजपाला मदत करण्यासाठी आम्ही उठाव केला, त्यांचा विचार भाजपा नक्कीच करेल, असं मला वाटतं. शेवटी पडत्या काळात जो आपल्यासोबत असतो तोच आपला भाऊ असतो. आता यांना चलतीचं नाणं दिसत आहे, 200 पेक्षा जास्त आमदार दिसत आहेत, संजय राऊत यांचा कार्यक्रम संपलेला आहे. मात्र मला असं वाटतं नाही, भाजपा शिवसेनेला (ठाकरे गट) जवळ करेल, असंही गुलाबरावांनी ठणकावून सांगितलंय.
हेही वाचा -