नागपूर : नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची मुलाखत अनेक मुद्द्यांवरुन सध्या चर्चेत आहे. यावेळी त्यांनी राजकीय मुद्द्यांसह आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या प्रश्नांवरही अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
प्रश्न : राजकीय अभ्यासात सध्या एका हास्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतायेत ते हास्य म्हणजे देवा भाऊंचं हास्य, या हास्याच्या लपेट्यात कोण कधी येईल, हे सांगता येत नाही ?
उत्तर : व्यक्ती मोठा झाला की, त्याच्या विविध गोष्टी बघून त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचं वर्णन केलं जाते. लहानपणापासून हसलो तर निरागस हसला असं म्हणतात. राजकारणात असं असलं, तर छद्मी हसलो म्हणतात. त्यामुळं जशी-जशी पदं बदलतात, तसं तसं त्या हास्याचे अर्थ बदलतात.
प्रश्न : महाविद्यालयीन जीवनात हास्याचा वसंत ऋतू येतो असं म्हणतात, तर त्या काळात या हास्याच्या लपेट्यामध्ये कोण-कोण आलं?
उत्तर: माझं महाविद्यालयीन जीवन हे सगळं आंदोलनांमध्ये गेलं. त्यामुळं तेव्हा कोणाला लपेटायचाही वेळ नव्हता आणि लपेटून घ्यायचाही वेळ नव्हता.
प्रश्न: याच हास्यामुळं संसार अमृताची प्राप्ती झाली का?
उत्तर : हे मात्र खरं आहे. मी नेमका कसा आहे आणि काय करणार आहे, याची शंभर टक्के माहिती जर तिला असती, तर कदाचित माझ्याशी तिनं लग्न केलं नसतं.
प्रश्न : मर्यादाहीन, पातळी सोडून अतिशय वाईट स्तरावरची वैयक्तिक टीका झाली, पण ना देवा भाऊंनी संयम सोडला ना धैर्य सोडलं, ही क्षमता तुम्ही कशी अर्जित केली?
उत्तर : एकच गोष्ट मी स्वतःला समजावली की कोणी कितीही शिव्या शाप दिले, तरी हे जग ते लक्षात ठेवत नाही. तर इतिहासात तुम्ही काय केलं हे लक्षात ठेवते. गेली पाच वर्ष माझ्यावर टीका करणारे, माझ्याबद्दल वाट्टेल ते बोलणाऱ्यांना कोण तरी लक्षात ठेवतं? मी काय केलं हेच सर्वांच्या लक्षात आहे. कधी तरी मनाला त्रास होतो, पण त्याचा विचार न करता आपलं काम आपण करत राहिलं पाहिजे. याची प्रेरणा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेतली पाहिजे. संयम काय असतो, हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे.
प्रश्न : मला नेहमी एक प्रश्न पडतो की, उमलत्या वयात दिविजाच्या कानावर अनेक गोष्टी पडत असतील, तेव्हा तिला कशा पद्धतीनं प्रश्न पडतात आणि एक पिता म्हणून तुम्ही त्याचं उत्तर कसं देतात?
उत्तर : मी नेहमीचं गंमतीनं असं म्हणतो की, आमच्या घरात सर्वात समजदार कोणी असेल, तर ती दिविजा आहे. या वयामध्ये तिच्यात प्रगल्भता आहे. आपण बघितलं असेल, की मी मुख्यमंत्री बनणार हे सर्व चालू होतं. त्यावेळी माध्यमांनी तिला प्रश्न विचारले. अशा वेळेस क्रूर प्रश्न विचारले जातात, अडचणीत येणारे प्रश्न विचारले जातात. कोणीतरी तिला प्रश्न विचारला की, तुला काय वाटतं तुझे वडील मुख्यमंत्री होतील का? तर त्यावर तिनं सांगितलं की, जो होईल तो महायुतीचा होईल आणि नेते ठरवतील तो मुख्यमंत्री होईल. तिला हे माहिती आहे की अशा प्रकारे राजकारणामध्ये टार्गेट केलं जातं. त्यामुळं मला असं वाटतं की, मॅच्युरिटी तिच्यामध्ये उपजतच आली आहे. तिला जर राजकारणात यायचं असेल, तर जरुर यावं पण फडणवीस कुटुंबातील शेवटचा राजकारणी मी असेल, असं मला वाटते.
प्रश्न: दिवंगत विलास फडणवीस यांच्या बाबतीत एखादी आठवण आहे का, की ज्यांच्यामुळं देवेंद्र आता देवा भाऊ होऊ शकले?
उत्तर : विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना पहिल्या कारसेवा विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून मी गेलो होतो. परत आल्यानंतर कॉलेजचं इलेक्शन झालं. एक दिवस मी आणि उदय डबले जुन्या कार्यालयात बसलो होतो. फुटपाथवर बसून आम्ही गप्पा मारत होतो, तर सुनील आंबेकर यांनी मला बोलावलं म्हणाले, देवेंद्र असा निर्णय झालाय की तू उद्यापासून भाजपाचं काम करायचं. मला काही राजकीय क्षेत्रात यायचं नव्हतं. मी म्हटलं की "मला नाही जायचं." तर ते म्हणाले की, तुम्हाला माहितीय आपल्याकडं एकदा ठरलं की ठरलं. त्यांनी मला विलासजी यांच्याकडं पाठवलं. त्यावेळी त्यांनी मला तिखट चिवडा आणि पुरणाची पोळी दिली. अर्धातास मला काही बोलू दिलं नाही. मला खूप बोलायचं होतं पण ते खाऊच घालत होते. मग त्यांनी मला विचारलं काय झालं, तर मी त्यांना सांगितलं की मला भाजपामध्ये जायचं नाही. त्यावर ते म्हणाले, तू स्वयंसेवक आहे, मग तू काय करणार तर जो आदेश असेल, ते काम करणार. "आमच्यामध्ये जी उपक्रमशीलता ती विलासजी यांच्यामुळं आली. सत्ता परिवर्तन होताना मुख्यमंत्री झालो असतो, तर जेवढा मान मिळाला नसता, त्यापेक्षा जास्त मान मला उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मिळालाय."
प्रश्न: हिवाळी अधिवेशन काळात उद्धव ठाकरे हे तुम्हाला भेटले. याविषयी काय सांगाल?
उत्तर : "महाराष्ट्रात एक राजकीय संस्कृती नेहमी राहिलीय. दक्षिणेच्या राज्यांमध्ये आपण जर गेलो तर तिथे खून के प्यासे असतात. तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती, दुर्दैवानं 2019 ते 2024 च्या कालावधीमध्ये काही प्रमाणात खून के प्यासे नाही, तरी ही बऱ्यापैकी थोडी परिस्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली होती. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच माझ्या भाषणामध्ये ही घोषणा केली की मला महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परत आणायची आहे. त्यामुळं मला बदल घडवणारं राजकारण करायचंय. बदल्याचे राजकारण करायचं नाही. चांगली गोष्ट आहे की, महाराष्ट्रात सगळ्या पक्षाचे नेते एकमेकाला भेटतायेत आणि जाहीरपणे बोलतायत".
हेही वाचा -
- फडणवीस-मुनगंटीवार धुसफूस चव्हाट्यावर? कन्नमवार शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती कार्यक्रमाला मुनगंटीवारांची गैरहजेरी
- आता घरबसल्या करा दस्त नोंदणी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली 'वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन' योजना
- संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, काय झालं भेटीत?