वॉशिंग्टन - बेकायदेशीरपणं राहणाऱ्या भारतीयांची अमेरिकेनं हकालपट्टी केल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर उपस्थित केला. जर भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत असतील तर त्यांना भारत त्यांना परत घेईल. मात्र, अमेरिकेनं मानवी तस्करीची व्यवस्था संपविण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, असे पंतप्रधान मोदींनी मत व्यक्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान म्हणाले, " अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे बहुतांश हे सामान्य कुटुंबातील आहेत. तर अनेकजण चुकीच्या मार्गदर्शनामुळे मानवी तस्करी प्रकरणातील आहेत. त्यांना मोठी स्वप्ने दाखवून आणि चुकीचे मार्गदर्शन केल्यानं ते अमेरिकेत पोहोचले आहेत. त्यामुळे आपण संपूर्ण मानवी तस्करीच्या व्यवस्थेवर हल्ला करायला हवा. भारत आणि अमेरिकेनं मानवी तस्करीची संपूर्ण व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या व्यवस्थेविरोधात आपला सर्वात मोठा लढा आहे. ट्रम्प ही व्यवस्था नष्ट करण्यासाठी आम्हाला संपूर्ण सहकार्य करतील, असा विश्वास आहे."
जे लोक बेकायदेशीरपणे इतर देशांमध्ये राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही. अमेरिका आणि भारताशी संबंधित बोलायचं झालं तर जे खरोखर भारताचे नागरिक आहेत, त्यांना भारतात परत घेण्याची आमची इच्छा आहे. हे आम्ही वारंवार सांगत आहोत-पंतप्रधान नरेंद्र मोदी
विरोधकांनी मोदी सरकारवर केली होती टीका- अमेरिकेनं १००हून अधिक भारतीयांना अमेरिकेच्या सैन्यदलाच्या विमानातून मायदेशी पाठविलं आहे. त्यामुळे विरोधकांनी संसदेत प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. संसदेतील गदारोळानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदन देऊन त्याबाबत मोदी सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांना परत आणण्याबाबत भारत सरकार अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे.
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या अध्यक्षांचे मानले आभार- २६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारत आणि अमेरिका दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्रितपणे काम करत आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा नाश करण्यासाठी ठोस कारवाई केली पाहिजे, यावर आम्ही सहमत आहोत. २००८ मध्ये भारतात नरसंहार करणाऱ्या गुन्हेगाराचं भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्षांचा आभारी आहे. भारतातील न्यायालये योग्य ती कारवाई करतील," असे ते म्हणाले.
हेही वाचा-