गुणरत्न सदावर्ते यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले पुणे Lok Sabha Elections 2024 : देशभरात लवकरच लोकसभा निवडणूक होणार असून भाजपानं पहिली यादी देखील जाहीर केली आहे. तसंच इतर पक्षांकडून देखील या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात येत आहे. असं असतानाच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी लोकसभा निवडणुकीविषयी प्रतिक्रिया देतांना मोठं वक्तव्य केलं आहे. 'वेळ आली तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात डंके की चोट पे निवडणूक लढवेल', असं सदावर्ते म्हणालेत. सदावर्तेंच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतील, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? : यावेळी बोलत असताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की,"मी निवडणुकीला कधीही अस्पृश्य समजत नाही. आज चुकीच्या विचारांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांसारखी माणसं पुढं चालली आहे. त्यामुळं यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची वेळ आली तर हिंदुत्ववादी पक्षाकडून नक्की डंके की चोट पे निवडणूक लढवेल आणि त्यांचं पाणीपत करून सोडेल."
प्रकाश आंबेडकर आणि जरांगेंचा पॉलिटिकल गेम? : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी, असं वक्तव्य केलं होतं. यासंदर्भात गुणरत्न सदावर्ते यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "प्रकाश आंबेडकरांचं ते व्यक्तिगत मत आहे. तसंच हा प्रकाश आंबेडकर आणि जरांगेंचा पॉलिटिकल गेम असू शकतो", अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.
नथुराम गोडसेचं विचारपीठ निर्माण व्हायला हवं : पुण्यातील जंगली महाराज रोडवर नथुराम गोडसे यांच्या स्मारकाला गुणरत्न सदावर्ते यांनी आज भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, "मी आज नथुराम गोडसेंच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. नथुराम गोडसे यांचं विचारपीठ निर्माण व्हायला हवं. आज अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे. राज्यात राजकारणाच्या नावावर आरक्षणाची दुकानदारी चालली असून ती थांबली पाहिजे. नथुराम गोडसे यांच्या विचारांना कम्युनिस्ट थांबवू शकत नाही."
हेही वाचा -
- " मराठा आरक्षणाबाबत जीआर काढताच, आम्ही..," गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला इशारा
- मराठा आरक्षणामुळं सर्व गुणवंतांची कत्तल होणार असल्याचा गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, जाहीर केला मोठा निर्णय
- मराठा आरक्षणाबाबतच्या अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार; गुणरत्न सदावर्तेंची भूमिका