नांदेड : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. त्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वतीनं दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शिवसेनेचे (उबाठा) खासदारही उपस्थित असल्याची माहिती समोर आली. दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावरुन शिवसेनेचे (उबाठा) आमदार तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे संतप्त झाल्याचं बघायला मिळालं. "शिवसेनेच्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या," असे स्पष्ट आदेशच आदित्य ठाकरेंनी शिवसेना (उबाठा) खासदारांना दिलेत. याच मुद्द्यावरुन आता मंत्री उदय सामंत यांनी जोरदार टीका केली.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत? : या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना उदय सामंत म्हणाले, "शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यानंतर काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठलाय. शरद पवारांनी शिंदेंचं कौतुक केलं हे अनेकांच्या जिव्हारी लागलं. त्यानंतर प्रतापराव जाधव यांच्याकडं जेवणाच्या कार्यक्रमाला काही खासदार उपस्थित राहिले. त्यामुळे काही लोकांना दुःख झालं. मला असं वाटतं की आता भविष्यात सकाळी नाष्टा काय करावा, दुपारी काय करावं, रात्री काय जेवण करावं याचा आदेशदेखील शिवसेनेच्या (उबाठा) खासदारांना देण्यात येऊ शकतात," असा टोला त्यांनी लगावला.
ऑपरेशन टायगरची गरज नाही- पुढं 'ऑपरेशन टायगर'बद्दल बोलतांना त्यांनी सांगितलं की, "ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात काम केलंय, ते पाहता आम्हाला कोणत्याही मिशनची आवश्यकता नाही. त्यांचे विचार जनसामान्यांमध्ये रुजले आहेत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे चालवित आहेत. हे शिवसेनेच्या (उबाठा) नेत्यांना कळालंय. त्यामुळं अनेकजण आता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत."
हेही वाचा -
- कोकणात ठाकरेंना धक्का, राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उदय सामंतांसह दिग्गज नेते उपस्थित
- "मला त्यांच्या तत्त्वांची माहिती नाही", आदित्य ठाकरेंची शरद पवारांवर टीका, गांधींच्या भेटीनंतर आदित्यनं घेतली केजरीवालांची भेट
- उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असण्याचे कारण नाही, पत्राबाबत उदय सामंत म्हणतात...