नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि इंडिया ब्लॉककडून विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज हे चित्र स्पष्ट होणार आहे. बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यातील लोकसभा निकालावर देशाचे नेतृत्व इंडिया आघाडी की एनडीएकडे हे निश्चित होणार आहे. कारण, या राज्यातूनच प्रादेशिक पक्ष हे भाजपाला आव्हान देत आहेत. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, तृणमुल पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि तेजस्वी यादव यांनी एनडीएला पराभूत करण्यासाठी संपूर्ण राजकीय कौशल्य पणाला लावले आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 303 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएला 352 जागा मिळाल्या होत्या. यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपानं 370 आणि एनडीएसाठी 400 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्यांपासून दूर करण्यासाठी विरोधी पक्षाकडून बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि महाराष्ट्रातून आव्हान देण्यात येत आहे. या राज्यांमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेण्यात आल्या आहेत. तरीही या राज्यांचे कल भाजपाच्या विरोधात गेले तर राजकीय चित्र बदलू शकते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत 190 मतदारसंघात काँग्रेसनं भाजपा विरोधात निवडणूक लढविली. त्यापैकी काँग्रेसला केवळ 15 जागावर विजय मिळविता आला. तर भाजपानं १७५ जागांवर विजयी होत सत्तेचा मार्ग सुकर केला. यामधील १७५ जागापैकी १० टक्के पेक्षा जास्त फरकानं १४४ जागा जिंकल्या होत्या. कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये भाजपाला काही जागा गमवाव्या लागल्या होत्या. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेस विरोधातील थेट लढतीत भाजपाला फारसे नुकसान होण्याची शक्यता नाही. मात्र, प्रादेशिक पक्ष भाजपाला आव्हान देऊ शकतात.
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची मजबूत स्थिती आहे. मात्र, बदललेली राजकीय समीकरणे, प्रादेशिक अस्मिता, राज्यांतील स्थानिक प्रश्न, राष्ट्रवादी-शिवसेना या दोन पक्षातील फूट यामुळे बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि महाराष्ट्रातील निकालाकडं सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. बिहार, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यातील 151 जागावरील निकालावर भाजपाचे ‘अब के बार, 40 पार’ हे लक्ष्य पूर्ण होईल की नाही, हे निश्चित होणार आहे.
- बिहार- राजदकडून भाजपाला कडवे आव्हान देण्यात आलेले आहे. 2019 मध्ये 54% मतांसह 40 पैकी 39 जागा एनडीएनं जिंकल्या होत्या. अधिकृत अहवालानुसार, बिहारच्या एकूण 7.64 कोटी मतदारांपैकी 20-29 वयोगटातील एकूण मतदारांची संख्या 1.6 कोटी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 53 टक्के मते मिळाली होती, मात्र भाजाचे लक्ष्य 60 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे आहे. तरीही, 40 पैकी 39 जागांवर भाजपाला विजय मिळविणं कठीण असणार आहे.
- पश्चिम बंगाल - 2019 मध्ये, भाजपानं पश्चिम बंगालमधील तृणमुल पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या 18 जागावर विजय मिळविला होता. तर तृणमुल पक्षानं २२ जागावर विजय मिळविला होता. गेल्या काही वर्षांपासून भाजपानं पश्चिम बंगालमध्ये लक्ष्य केंद्रित करून तृणमुलची सत्ता खिळखिळी करण्याकरिता प्रयत्न केले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पूर्वीपेक्षा जास्त जागांवर विजय मिळविता आला तर इतर राज्यांमधील नुकसान भरून काढण्यास मदत होऊ शकते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला चांगले यश मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीत व्यक्त केला होता. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सत्ता कायम टिकविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत भाजपावर सातत्यानं निशाणा साधला. भाजपाला जोरदार प्रचार करून 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमुल पक्षाकडून सत्ता काबीज करता आली नाही. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडं भाजपाचे लक्ष्य लागलेलं आहे.
- ओडिशा: ओडिशामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी) यांची युती होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपाने लोकसभेच्या 21 पैकी आठ जागा जिंकल्या होत्या. तर बीजेडीने 12 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला फक्त एक जागेवर विजय मिळविता आला होता. . बीजेडीला 42.8%, भाजपला 38.4% आणि काँग्रेसला 13.4% मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपाला यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाकडून बीजेडीला मोठे आव्हान निर्माण झाले. पंतप्रधान मोदी यांच्या नावानं भाजपाकडून ओडिशामधील प्रचारात मते मागण्यात आली.
- महाराष्ट्र-2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनं एकूण 48 जागांपैकी 41 जागा जिंकल्या होत्या. तर एकूण 51.34% मते मिळवली होत्या. त्यापैकी भाजपानं 25 जागा लढवून 23 जागांवर विजय मिळविला होता. तर मित्रपक्ष शिवसेनेने 23 जागा लढवून 18 जागांवर विजय मिळविला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये मतविभाजन झाल्याने राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. भाजपाला शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी ( अजित पवार गट) या बलाढ्य गटांचा पाठिंबा मिळाला. असे असले तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभुतीचे वातावणर असल्याची स्थिती आहे. ही सहानुभूती मतातमध्ये रुपांतरित होते का, हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची कामगिरी कशी ठरते, यावर त्या पक्षांचा वारसा कुणाकडं हे निश्चित होणार आहे.
हेही वाचा-
- लोकसभा निवडणूक निकाल 2024 : देशात सत्तापरिवर्तन होणार? मतमोजणी सुरु, पोस्ट बॅलेटमध्ये एनडीए आघाडीवर - Lok Sabha election results 2024
- खासदार होण्याकरिता सुरू आहे रस्सीखेच, तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा! - Lok Sabha Election Results 2024