नागपूर- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेत परभणीतील हिंसाचार आणि बीडमधील सरपंच मृत्यू प्रकरणाची चर्चा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतमालाला भाव द्या, अशी मागणी करत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
Live Updates
- शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा, अशी मंगळवारी मागणी केली. त्यावरून भाजपा नेते राम कदम यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना टीका केली. ते म्हणाले, "राहुल गांधी वीर सावरकरांवर टीका करताना उद्धव ठाकरे हे गेल्या 5 वर्षांपासून गप्प आहेत. लोकांनी जागा दाखवून दिल्यानंतर त्यांना वीर सावरकर यांची आठवण आली".
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल राज्यसभेत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. ते वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, " त्यांनी (अमित शाह) ‘डॉ. बाबासाहेबदेखील म्हटले नाही. ते फक्त ‘आंबेडकर..आंबेडकर’ म्हणाले. ज्यांना लोकशाही मान्य नाही, असे त्यांच्यासारखे लोक सत्तेत बसले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले. त्या संविधानाच्या आधारेच ते आज गृहमंत्री झाले आहेत".
- अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सुधीर मुनंगटीवार विधानभवनमध्ये दाखल झाले आहेत. ते म्हणाले, " पक्ष सर्वोतपरी आहे. पक्षाचे काम करत राहणार आहे. मंत्रिपद साधन आहे, साध्य नाही". यापूर्वी सुधीर मुनंगटीवार यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं खदखद व्यक्त केली.
- अमित शाह यांच्या वक्तव्यावरून विधानपरिषदेत गदारोळ झाला. अमित शाहांच्या वक्तव्यावरून विरोधक राजकारण करत आहेत, अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली.
- कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा, यासाठी विरोधकांनी आंदोलन केले. राज्यात खरेदी केंद्र कमी स्वरुपात असल्याचं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
- काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशन झाल्याचं अमित शाह यांनी संसदेत वक्तव्य केलं होतं.
- "मला मंत्रिपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. नाराजीचा कुठलाही प्रश्न नाही. प्रश्न तडीस लावणार आहे. मी नाराज नाही, असे भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. फडणवीस यांच्यामुळे विदर्भाचा अनुषेष भरून निघणार," असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
- सभागृहाची निर्मिती बाबासाहेबांच्या संविधानामुळे निर्मिती झाली. त्यांनी त्यांची टिंगलटवाळी केली आहे. आम्हाला देवळात येण्याची परवानगी नव्हती. देवाच्या पुढे आम्हाला डॉ. बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांमुळेच आम्हा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे (एसपी) नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
हेही वाचा-