मुंबई : आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँके लिमिटेड'नं कर्ज वसुलीसाठी सभासदाला मृत घोषित करून त्याच्या वारसाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय? तर विशेष असं की ज्या व्यक्तीला मृत घोषित केलंय, ती व्यक्ती अजूनही जिवंत आहे.
जिवंत व्यक्तीला मृत दाखवणं आणि मृत व्यक्तीला जिवंत दाखवणं, असे प्रकार आपण निवडणूक काळात पाहतो. मतदारांच्या यादीत मृत व्यक्तींची नावं असतात. तर, जिवंत व्यक्तींची नावं मृत व्यक्तींच्या यादीमध्ये असतात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र, हे निवडणुकीबाबत नसून चक्क मुंबई महापालिकेच्या बँकेत घडलंय. इतकंच नव्हे तर, थकीत कर्ज भरा अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही नोटिशींमार्फत देण्यात आलाय. यामुळं बँकेच्या कार्यपद्धतीवर प्रशचिन्ह उपस्थिती होत असून बँकेच्या सभासदांनी संताप व्यक्त केलाय.
नेमकं काय आहे प्रकरण? : याबाबत अधिक माहिती अशी की, केशव अप्पा सावंत हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत सफाई कर्मचारी होते. सोबतच म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेचे सभासद होते. नोकरीवर असताना केशव यांनी 7 नोव्हेंबर 2022 रोजी पालिकेच्या बँकेतून 15 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. त्यानंतर, ऑगस्ट 2023 रोजी ते सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर केशव सावंत यांच्या जागी त्यांचे चिरंजीव संदीप सावंत हे सेवेत रुजू झाले. त्यानंतर म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेनं कर्जाची थकीत वसूल करण्यासाठी बँकेचे सभासद असलेल्या केशव अप्पा सावंत यांना मृत घोषित करत त्यांच्या वारसाला कर्ज वसुलीसाठी कायदेशीर नोटीस पाठवली. "थकीत कर्ज भरा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल," असा इशारा बँकेनं नोटीसद्वारे दिला. इतकंच नाही तर, या नोटीसमध्ये विठ्ठल अ. कांबळे यांचाही उल्लेख करण्यात आलाय. मात्र, ही दोन्हीही स्वतंत्र कर्ज प्रकरणं आहेत. बँकेनं केलेल्या या गंभीर चुकीमुळं सभासदांत नाराजीचं वातावरण बघायला मिळतंय.
बँकेवरील विश्वास उडण्याची शक्यता : याबाबत म्युनिसिपल मजदूर संघाचे नेते रुपेश पुरळकर म्हणाले की, "बँकेच्या या गंभीर त्रुटीची तातडीनं दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी केलीय. बँकेनं योग्य ती चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर या प्रकारामुळं सभासदांचा बँकेवरील विश्वास उडण्याची शक्यता आहे. यापूर्वी, महापालिकेच्या डी विभागातील सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला बँकेकडून उलटं सन्मान चिन्ह दिलं गेलं होतं. बँकेच्या अशा गोष्टींनी सभासद आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होत आहे."
बॅंकेचं म्हणणं काय? : म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना 1951 साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली. आज घडीला या बँकेचे एकूण 71,013 सभासद आहेत. 31 मार्च 2024 च्या अहवालानुसार, बँकेकडं 4257.62 कोटी रुपयांच्या एकूण ठेवी आहेत. बँक महापालिका कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वित्तीय सेवा पुरवते. यामध्ये बचत खाते, मुदत ठेव, कर्ज आदींचा समावेश आहे. असं असताना देखील इतक्या संपन्न बँकेच्या व्यवस्थापनात घडलेल्या या प्रकारामुळं कर्मचारी आणि सभासदांकडून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, याबाबत पालिकेच्या बँकेचे महाव्यवस्थापक विनोद रावदका यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, "टायपो एररमुळं ही चूक झालेली आहे. संबंधित शाखेला आम्ही यांसंदर्भात खुलासा मागितलाय. खुलासा आल्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू."
हेही वाचा -