मुंबई : राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यामुळं राज्यातील सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहेत. त्यामुळं विरोधकांकडून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
'या' मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी : धनंजय मुंडे यांच्यावर बीड मधील मत्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या कथित संबंधांवरून प्रचंड टीका होत आहे. तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर कृषी खात्यातील गैरव्यवहारांच्या आरोपांचा सपाटा लावला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी होत आहे. मुंडे यांना कौटुंबिक न्यायालयानं करुणा शर्मा प्रकरणात आर्थिक सहाय्य द्यावं असा निर्णय यापूर्वी दिला आहे. मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी तक्रार केली होती. त्यावर परळीच्या फौजदारी न्यायालयानं मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी अर्जात माहिती देताना सत्य माहिती लपवल्याचा आरोप करत त्याबाबत ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली होती.
बनावट कागदपत्रं दाखल करून नाशिक जिल्ह्यात शासकीय कोट्यातून सदनिका मिळवल्याप्रकरणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. या प्रकरणात विधिमंडळ सचिवालयानं तातडीनं निर्णय घेत कोकाटे यांची विधानसभेची जागा रिक्त केल्यास कोकाटे यांचं मंत्रीपद आणि आमदारकी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, विधिमंडळ सचिवालयानं याबाबत सबुरीचं धोरण घेऊन कोकाटे यांच्या प्रकरणात वरिष्ठ न्यायालयाच्या निर्णयापर्यंत प्रतीक्षा केल्यास आणि वरिष्ठ न्यायालयानं कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास त्यांची आमदारकी शाबूत राहील. या प्रकरणात शिक्षा झाल्यानं कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे.
आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास : "गुजरातमधील न्यायालयानं जेव्हा राहुल गांधीना दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती, तेव्हा राहुल गांधींनी तत्काळ राजीनामा दिला नव्हता. उच्च न्यायालयात त्यांनी दाद मागितली आणि उच्च न्यायालयानं निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यावर पुढील प्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळं या प्रकरणात देखील आम्ही दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. संविधानानं सर्वांना दिलेला हा अधिकार आहे. त्यामुळं आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये आम्ही आमची न्यायालयात बाजू मांडू आणि कोकाटे यांना निर्दोषत्व मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. या प्रकरणात राजकीय द्वेषापोटी केलेला आरोप होता, आम्ही आमची बाजू योग्यपणे न्यायालयासमोर ठेवू." असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट मंत्र्यांची टोळी झाली आहे. त्यामुळं धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोघांची मंत्रिमंडळातून तातडीनं हकालपट्टी करावी. तसंच कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानं त्यांची आमदारकी त्वरित रद्द करावी." अशी मागणी केली.
कोकाटेंची आमदारकी कधी रद्द करणार? : "ज्याप्रमाणं मानहानी प्रकरणात न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर खासदार राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासांत रद्द करण्यात आली होती. माजी मंत्री सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी २४ तासांत आमदारकी रद्द केली होती, त्याप्रमाणं आता राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहेत? धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही असं म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेतला नाही? कोकाटे यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयानं शिक्षा सुनावली, तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही! सत्ता आहे म्हणून 'आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड' ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय?" अशा स्वरुपाची पोस्ट विजय डेट्टीवार यांनी सोशल मीडियावर केली आहे.
हेही वाचा :
- धक्कादायक ! 42 वर्षीय सासऱ्यासह मित्राचा 20 वर्षीय सुनेवर बलात्कार; तब्बल 15 दिवस डांबून नराधमांनी केले अत्याचार
- एकनाथ शिंदे यांच्या कारला बॉम्बनं उडवण्याची धमकी : देऊळगाव महीच्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ला; माथेफिरुनं केलेल्या हल्ल्यात तीन प्रवासी जखमी, हल्लेखोराला अटक