अहिल्यानगर : राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील राधाकिसन गुळवे यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून सेंद्रिय शेतीचा मार्ग निवडलाय. विषमुक्त शेतीच्या दिशेने उचललेलं हे पाऊल त्यांना लाखो रुपयांचं उत्पन्न देतंय. यंदा त्यांनी आपल्या शेतात खपली गव्हाची लागवड केली असून, हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतावर गर्दी करीत आहेत. राधाकिसन गुळवे हे लोणी येथील एका आयटीआयमध्ये प्राध्यापक होते. त्यांना दरमहा 30 हजार रुपये पगार मिळत होता. प्रवचन ऐकण्याची त्यांना आवड होती. एकदा त्यांनी कर्करोगाच्या कारणांबाबत माहिती ऐकल्यावर विषमुक्त अन्नाचा प्रसार करण्याचा निर्धार केला. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून गेल्या 10 वर्षांपासून संपूर्णतः आपल्या शेतीत सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केलीय.
खपली गव्हाची शेती आरोग्यासाठी वरदान : गुळवे यांच्याकडे एकूण 10 एकर शेती आहे. जिथे ते नवनवीन प्रयोग करीत असतात. यावर्षी त्यांनी 3 एकर शेतीत खपली गव्हाची लागवड केलीय. ठिबक सिंचनाच्या मदतीने पाणी व्यवस्थापन केले असून, संपूर्णतः सेंद्रिय खतांचा वापर केलाय. खपली गव्हाचे पीठ अधिक पौष्टिक असून, इतर गव्हाच्या तुलनेत या गव्हाला भाव अधिक मिळतो आणि आरोग्यदायी हा गहू असल्याने गुळवे यांनी या सिझनमध्ये आपल्या तीन एकर शेतीत खपली गव्हाची लागवड केलीय. तीन एकर क्षेत्रातील या गव्हाला उत्तम असे फुटवे फुटले असून, ते पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करतायत. खपली गव्हाचा प्रसार व्हावा आणि नागरिकांना विषमुक्त अन्न मिळावे या उद्देशाने या वर्षी येणाऱ्या उत्पादनातून बहुतांशी गहू हा शेतकऱ्यांना बियाणे म्हणून विकण्याचा मनोदय गुळवे यांचा आहे.

खपली गव्हाची दाणेदार चव : या खपली गव्हाचे दाणे हे कवचयुक्त असतात. त्याचा आकार लांबट असतो आणि रंग लालसर तपकिरी असतो. खपली गव्हाची दाणेदार चव असते. खपली गव्हाची पौष्टिक घनता असून, खपली गव्हाचे पीठ निरोगी असते. खपली गव्हाची लागवड सामान्य पिकांसोबतही करता येते. खपली गव्हाचा रवा, शेवयांना मोठी मागणी आहे. खपली गव्हाबरोबरच भरडा करून लापशी आणि दलियाही तयार करता येते. शहरी भागातही या खपली गव्हाला चांगली मागणी आहे.
एकूण साडेचार लाख रुपये मिळणार : तीन एकर क्षेत्रावर खपली गव्हाची शेती करण्यासाठी एक लाख रुपये खर्च आलाय. तर एकरी 1 लाख 50 हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. तीन एकरात 4 लाख 50 हजार रुपये उत्पन्न मिळणार असून, आतापर्यंत शेतीसाठी लागलेला 1 लाख रुपये खर्च वजा केला तर निव्वळ नफा 3 लाख 50 हजार रुपये मिळणार असल्याचं शेतकरी राधाकिसान गुळवे यांनी सांगितलंय.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण : गुळवे यांचा हा प्रयोग फक्त आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, तर तो आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. विषमुक्त अन्ननिर्मितीच्या दिशेने उचललेलं हे पाऊल शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे.
हेही वाचा :