छत्रपती संभाजीनगर : आपल्या विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषण, साखळी उपोषण केलं जातं. असंच एक उपोषण शहरात सध्या चर्चेत आलं आहे. कारण हे साखळी उपोषण एक दोन नाही तर तब्बल 1930 दिवसांपासून सुरू आहे. व्हिडिओकॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तब्बल पाच वर्षांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या अन्याया विरोधात न्याय मागण्यासाठी लढा उभारण्यात आला होता. मात्र अद्याप न्याय मिळत नसल्यानं माघार घेणार नाही अशी भूमिका व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉइज असोसिएशनतर्फे घेण्यात आली आहे.
340 कर्मचाऱ्यांनी सुरू केलं आंदोलन : जगात आपल्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हिडिओकॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारावा लागला आहे. वेतन आणि भविष्य निर्वाह निधीसाठी 340 कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केल. त्याला आता 1930 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही मागण्या पूर्ण होत नसल्यानं आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेनं केला आहे. व्हिडिओकॉन समुहानं छत्रपती संभाजीनगर येथील कंपनी बंद केली. याबाबत कामगारांना पूर्व कल्पना न देता हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं त्यांचं वेतन आणि भविष्य निर्वाह निधी देखील त्यांना मिळाला नाही.
वारंवार विनंती करूनही उत्तर नाही : कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेऊन व्हिडिओकॉन कंपनीनं पोबारा केला आहे. अनेक ठिकाणी असलेल्या शाखा त्यांनी अचानक बंद केल्या. त्यात छ. संभाजीनगर येथील कंपनीत काम करणाऱ्या 340 चालकांनी थकीत वेतनाबाबत पत्रव्यवहार केला. व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉइज असोसिएशनतर्फे पाठपुरावा करण्यात आला. मात्र न्याय मिळाला नाही. विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कामगार मंत्रालय, कामगार आयुक्त यांच्याकडं दाद मागण्यात आली होती. अखेर 27 ऑगस्ट 2019 पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं. कोविड काळात आणि नंतर ऊन, वारा, पाऊस असला तरी आंदोलन सुरू ठेवण्यात आलं. रोज वेगवेगळे कामगार उपोषण करत असल्याची माहिती कामगारांनी दिली.
न्याय मिळेना, म्हणून आंदोलन सुरू राहणार : न्याय हक्कासाठी लढा लढत असताना लेबर कोर्ट, युनियन कोर्ट, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, भविष्य निर्वाह निधी कार्यालय यांच्याकडून कामगारांच्या बाजूनं निर्णय देण्यात आला. त्याबाबत कंपनीच्या मालकाला लेबर कोर्टाने नोटीस बजावली. असं असलं तरी ते न्यायालयात हजर होण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडं पोलीस देखील कारवाई करत नसल्यानं अखेर साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉइज असोसिएशनतर्फे घेण्यात आला. आंदोलनाला 1930 दिवस पूर्ण झाले असले तरी न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा, व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉइज असोसिएशन अध्यक्ष गजानन खंदारे यांनी दिलाय.
कामगार मंत्र्यांच्या आदेशाला देखील जुमानेना : कामगारांचा लढा त्यांच्या थकीत 8 ते 10 कोटी रुपयांसाठी उभारण्यात आला आहे. न्यायालयाच्या सूचना असूनही कारवाई होत नाही. त्यावर बच्चू कडू यांनी चौकशी समिती नेमण्याचं नियोजित केलं. त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र नंतर मंत्री बदलले आणि पुढील हालचाल थांबली. तर हे उपोषण सुरू राहणार असल्याचं ॲड. अभय टाकसाळ यांनी सांगितलं.
हेही वाचा -