नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियम नेरूळ येथे 'कोल्डप्ले' या जागतिक दर्जाच्या संगीत कार्यक्रमाचं 18, 19, 21 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाचे गायक या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. सुमारे 45 हजारांपेक्षा अधिक प्रेक्षक या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असल्याचं सांगितलं जातंय.
कोल्डप्लेमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आलाय. तसंच या कालावधीत नवी मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आलेत.
वाहतूक व्यवस्थेत बदल : नवी मुंबईत होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस (18, 19 आणि 21 जानेवारी) उरण, न्हावाशेवा, पुणे, ठाणे तसंच मुंबईकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आलीय. तर एलपी ब्रीज सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनि मंदिर कमान ते भीमाशंकर चौक या परिसरातदेखील वाहनांना प्रतिबंधित करण्यात आलंय. या परिसराला पोलिसांनी 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषित केलंय. तसंच इंडियन ऑईल टर्मिनल सर्व्हिस रोड ते रहेजा कॉर्नर, शिवाजी नगर ते पुण्यनगरी पर्यंतचा मार्ग देखील 'नो पार्कींग झोन' म्हणून घोषित करण्यात आलाय. या मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आलीय.
कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी नेरुळमधील तेरणा ग्राउंड, तुळशी मैदान, सीबीडी बेलापूर पार्किंग सेक्टर -15 मधील महापालिकेचे पार्किंग, तुर्भे येथील युनिव्हर्सल माईंड स्पेस, खारघर येथील बीडी सोमानी स्कूल तसंच सेक्टर-32 मधील फुटबॉल गाऊंड या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीय. तसंच कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी खासगी बसचीदेखील मोफत व्यवस्था करण्यात आलीय. त्याचप्रमाणे ओला, उबर आणि खासगी टॅक्सीसाठी माईडस्पेस आणि भीमाशंकर मैदान येथे पिकअपची व्यवस्था करण्यात आली आहे.
- सुरक्षेसाठी पोलीस दल तैनात : या कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवशी डी. वाय. पाटील स्टेडीयमच्या आत सुरक्षेसाठी 1 पोलीस उपायुक्त, 70 पोलीस अधिकारी, 434 पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसंच स्टेडीयमच्या बाहेर वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी 1 पोलीस उपआयुक्त, 21 पोलीस अधिकारी, 440 पोलीस अंमलदार असा बंदोबस्त करण्यात आला आहे.
अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीवर ठेवणार विशेष लक्ष : या कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. त्याचप्रमाणे ब्लॅक मार्केटिंगद्वारे या कार्यक्रमाच्या बनावट तिकीटाची विक्री करणाऱ्यांवर देखील विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं कुणीही अंमली पदार्थ घेऊन येण्याचा प्रयत्न करु नये. या कार्यक्रमादरम्यान अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ स्थानिक पोलीस आणि 112 या पोलीस मदत क्रमांकावर माहिती कळवावी, असं आवाहनही पंकज डहाणे यांनी केलंय.
हेही वाचा -