हैदराबाद : टीव्हीएसनं भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये ज्युपिटर सीएनजी स्कूटर सादर केली आहे. ही देशातील पहिली स्कूटर आहे, जी सीएनजीवर चालेल. यापूर्वी, बजाजनं फ्रीडम मोटरसायकल देखील सादर केली होती, जी सीएनजीवर चालणारी देशातील पहिली मोटरसायकल होती. ज्युपिटर सीएनजी आणि पेट्रोल दोन्हीवर चालवू शकते. तीचा टॉप स्पीड 80.5 किमी प्रतितास आहे.
किती असेल किंमत
सध्या, टीव्हीएस ज्युपिटर सीएनजीची किंमत जाहीर केलेली नाही. पेट्रोल ज्युपिटर 125 ची किंमत 79,540 ते 90,721 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. त्यामुळं सीएनजी आवृत्ती देखील या किंमत श्रेणीच्या किंतीतच लाँच केली जाण्याची शक्यता आहे. ज्युपिटर सीएनजी जवळजवळ उत्पादनासाठी तयार आहे. मात्र, तिच्या लाँचिंगची तारीख आजूनही जाहीर झालेली नाहीय.
दोन इंधन पर्याय
टीव्हीएस ज्युपिटर सीएनजीमध्ये सीटखाली एक सीएनजी सिलेंडर बसवण्यात आला आहे, जो 1.4 किलो (9.5 लिटर) गॅस सामावून घेऊ शकतो. त्यात 124.8 सीसी, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 6000 आरपीएमवर 7.2 एचपी आणि 5,500 आरपीएमवर 9.4 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे कॉन्फिगरेशन पेट्रोल ज्युपिटर 125 पेक्षा थोडं कमी आहे, जे 8.1 एचपी आणि 10.5 एनएम जनरेट करतं.
किती आहे टॉप स्पीड
टीव्हीएसचा दावा आहे की त्याचा टॉप स्पीड 80.5 किमी प्रतितास आहे. त्याची रेंज 84 किमी/किलोग्रॅम आहे आणि पेट्रोलसह एकूण रेंज 226 किमी असल्याचं सांगितलं जातं. ज्युपिटर सीएनजी स्कूटरमध्ये सीटखाली गॅस टँक असल्यानं, स्टोरेजसाठी यात जागा नाहीय. यात तुम्हाला डीजी-अॅनालॉग डिस्प्ले, यूएसबी चार्जर आणि स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञान मिळणार आहे.
हे वाचलंत का :