बीड : संतोष देशमुख खून प्रकरणातील सहा आरोपींची आज सीआयडी कोठडी संपत आहे. या सहा आरोपींना आज केज न्यायालयात हजर करणार होते, मात्र सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालय बीड येथे याची सुनावणी होणार आहे. आज दुपारी एक वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे प्रतीक घुले, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे या सहा जणांना पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करणार आहेत. मकोका संदर्भात देखील सुनावणी पार पडणार आहे. मात्र या प्रकरणात पुढील कार्यवाही काय होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी पार पडणार आहे.
वाल्मिक कराडच्या जामिनावर केज न्यायालयात सुनावणी : वाल्मिक कराडच्या जामिनावर आज केज न्यायालयात दुपारी सुनावणी होणार आहे. खंडणी गुन्ह्याच्या संदर्भात ही सुनावणी होणार आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील कटात सहभागी असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे. याच कारणामुळे त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. केज न्यायालयात दाखल असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची शक्यता, केज न्यायालयाचे न्यायाधीश एस बी पावस्कर यांच्यासमोर आज वाल्मिक करायला हजर करणार आहेत.
बीडचे पोलिसच चौकशीच्या फेऱ्यात...! : संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास केला आहे का नाही, यासंदर्भात एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीसमोर पोलिसांची चौकशी होणार आहे. निवृत्त न्यायाधीश तहालिया यांची एक सदस्य समिती चौकशी करणार आहे. संतोष देशमुख खून प्रकरण नेमकं कसं हाताळलं आहे, याची चौकशी होणार आहे. या प्रकरणाची चौकशी करून तीन ते सहा महिन्यांमध्ये याचा अहवाल ही समिती शासनाला सादर करणार आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही चौकशी केली जाणार आहे. या घटनेची पार्श्वभूमी काय, याची संपूर्ण कारणं तपासली जाणार आहेत. त्यामुळे आता पोलीसच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या प्रकरणात नेमकं कोण कोण अडकणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :