जळगाव : बीड आणि परभणी या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. बीड आणि परभणी येथे झालेल्या घटनेत दोन जणांचा जीव गेलेला आहे, दरम्यान या घटनेचं गांभीर्य महायुती सरकारला नाही, अद्यापपर्यंत त्यांच्यामध्ये गृहमंत्री कोण हे ठरलेलं नाही. मलिदा खाण्यासाठी आपल्या आवडीचं खातं मिळण्यासाठी आपापसामध्ये समन्वय नसल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडं छगन भुजबळ यांना डावलून नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद दिल्यानं त्यांच्यावर अन्याय केल्याची माहिती रोहिणी खडसे यांनी दिली.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे? : "परभणीमधील घटना ही निषेधार्थ आहे. जी काही घटना घडली आहे त्या घटनेसंदर्भात सरकारने योग्य ती कारवाई करावी. तेथील लोकांना एक सुरक्षित वातावरण आणि न्याय देण्याची भूमिका लवकर घेणं अपेक्षित आहे. सरकार या घटनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा दाखवत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित समाजाला असं कुठेतरी वाटत आहे की, आपल्यावर कुठे तरी अन्याय होतो की काय? अनेक ठिकाणी त्यांची आंदोलनं सुरू आहेत. सरकार त्यांना विश्वास द्यायला कुठेतरी कमी पडत आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक अस्वस्थता पाहायला मिळतेय" अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली.
काय आहे घटना? : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचं भर दुपारी रस्त्यावरुन अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळं बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. परभणी इथल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाला होता. तर सोमनाथच्या मृत्यूच्या घटनेच्या विरोधात राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र बंदची हाक दिली.
हेही वाचा -