सातारा : फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर करण्यासाठी खासगी इसमांमार्फत 5 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी तिसरे सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल आहे. त्यातील दोन संशयित सोमवारी (16 डिसेंबर) सरेंडर झाले होते. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संशयितांचा ताबा ॲन्टीकरप्शनकडे : पाच लाखांची लाच मागितल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेले आनंद मोहन खरात, किशोर संभाजी खरात हे सोमवारी न्यायालयात शरण आल्यानंतर मंगळवारी (17 डिसेंबर) पुन्हा त्यांना हजर करण्यात आलं. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी 13 कारणांसाठी संशयितांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी त्यांची मागणी मान्य करत दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. तसंच तपासकामी दोन्ही संशयितांना ॲन्टीकरप्शनच्या ताब्यात देण्यात आलं.
एक संशयित पोलीस दलात सहाय्यक फौजदार : लाच मागितल्याच्या गुन्ह्यातील किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई) हा पोलीस दलात सहाय्यक फौजदार असल्याचं ॲन्टीकरप्शन विभागाच्या तपासात समोर आलंय. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. सहाय्यक फौजदारावर लाच मागितल्याचा गुन्हा नोंद झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानं सहाय्यक फौजदाराच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
हायकोर्टात न्यायाधीशांचा अटकपूर्व जामीन दाखल नाही : लाच प्रकरणातील मुख्य संशयित जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांचा तात्पुरता (इंटेरिम) आणि नियमित (अँटीसिपेटरी) अटकपूर्व जामीन अर्ज मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी फेटाळला आहे. त्यामुळं अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज करणार असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं होतं. मात्र, चार दिवस झाले तरी न्यायाधीश निकम यांचा अर्ज अद्याप हायकोर्टात दाखल झालेला नाही.
हेही वाचा