बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली होती. या मागणीला यश आलं असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून तर, अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. यावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, आंदोलन करूनचं न्याय मिळणार असेल तर, आम्ही तेही करायला तयार आहोत.
मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो : "सरकारच्या निर्णयामुळं देशमुख कुटुंबीयांना मोठा धीर मिळाला. या निर्णयामुळं संतोष देशमुख यांना लवकरच न्याय मिळेल. अन्यायाविरुद्धचा आपला हा लढा सुरूच राहणार आहे. आरोपींना लवकरच शिक्षा होईल. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो." अस धनंजय देशुमख म्हणाले.
काय म्हणाले धनंजय देशमुख : "काल आंदोलनाची सुरुवात झाली अन् आज मागणी मान्य झाली. यामध्ये कुठंतरी आंदोलन केल्यानंतरच न्याय मिळतोय का?" असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला. "आज उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. मात्र, आंदोलन करूनच जर न्याय मिळत असेल तर, आरोपींना फाशी झाली पाहिजे. 'अन्नत्याग आंदोलन'करून किंवा रस्त्यावर उतरून जर न्याय मिळणार असेल तर, आम्ही तेही करायला तयार आहोत. यामध्ये आम्ही प्रमुख मागण्या एकत्र बसून तयार करणार आहोत. आरोपींना पकडण्यासाठी आणि ही केस फास्टट्रॅक कोर्टमध्ये चालवण्याची आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावरच आम्ही आतापर्यंत आहोत. उज्ज्वल निकम यांची जी नियुक्ती केली आहे, ती आमच्यासाठी चांगली आहे." अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.
धनंजय देशमुख यांच्या काय आहेत प्रमुख मागण्या :
- हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून लवकर न्याय द्यावा.
- वाल्मीक कराडांबरोबर जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा.
- डॉक्टर वायबसे याला अटक करावी.
- बालाजी तांदळे याला तपासात घ्यावे.
- कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा.
- या ठिकाणी जी 'बी टीम' काम करत आहे त्यांना सह आरोपी करा.
- धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा.
हेही वाचा :